लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बदलापूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमकप्रकरणी सध्या तरी आमचा पोलिसांवर संशय नाही. मात्र आरोपीच्या पायावर किंवा हातावर गोळी न झाडता ती थेट डोक्यात झाडली गेल्याने या घटनेला चकमक म्हणता येणार नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने बुधवारी केली. अक्षयच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनेक प्रश्न विचारत सरकारी वकिलांची झाडाझडती घेतली.

शिंदे याला तळोजा कारागृहातून बदलापूरला नेले जात असताना सुरुवातीला तो खूपच शांत होता. मात्र, अचानक त्याने सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्याकडील पिस्तूल हिसकावले आणि त्याच्या बंदोबस्तासाठी गाडीत असलेल्या पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या. त्यात एक पोलीस जखमी झाला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, असे पोलिसांच्या वतीने मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, पोलिसांचा हा दावा अविश्वसनीय असून ही घटना दिसते तशी सरळ नाही. रिव्हॉल्वरने कोणीही गोळी झाडू शकतो, पण सामान्य माणूस पिस्तुलाने गोळीबार करू शकत नाही असे सांगत न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने अधोरेखित केले. शिंदे याने पिस्तूल हिसकावून पहिल्यांदा गोळी (पान १० वर) (पान १ वरून) झाडली त्या वेळीच पोलिसांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवायला हवे होते. अक्षय हा काही बलदंड इसम नव्हता. त्यामुळे, पोलीस त्याला सहज नियंत्रित करू शकले असते आणि चकमक टळली असती, असेही न्यायालयाने नमूद केले. शिंदेसह गाडीत असलेल्या पोलिसांची कृती विचारात घेता घटनेला चकमक म्हणता येणार नाही याचा न्यायालयाने पुनरुच्चार केला.

हेही वाचा >>>Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेचं प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन, “ट्रेनमध्ये अडकून पडला असाल तर…”

शिंदे याच्या थेट डोक्यात गोळी झाडणारे पोलीस अधिकारी संजय शिंदे यांनी नियमाप्रमाणे आधी त्याच्या पायावर गोळी झाडणे अपेक्षित होते. शिवाय, शिंदे याला घेऊन जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांत ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचा समावेश होता आणि त्यांना चकमकीचा पूर्वानुभव होता. त्यामुळे, एका आरोपीला वाहनात उपस्थित असलेले चार पोलीस अधिकारी नियंत्रित करू शकले नाही यावर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्नही खंडपीठाने सरकारी वकिलांना केला. त्यावर, संबंधित अधिकाऱ्याने घटनेच्या वेळी नियमांचा विचार केला नव्हता, तर केवळ हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्याचे वेणेगावकर यांनी सांगितले. त्यावर या प्रकरणी अद्याप आमचा पोलिसांच्या दाव्यावर संशय नाही. परंतु, नेमके काय घडले याबाबतचे सत्य समोर येणे आवश्यक आहे. तसेच, प्रकरणाचा तपास पारदर्शक व निष्पक्षपणे व्हायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. असे असताना प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे अद्याप राज्य सीआयडीकडे का वर्ग केली नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली. अशा घटनांतील पुराव्यांचे जतन करणे अत्यावश्यक आहे. परंतु, तपासात कोणताही विलंब पोलिसांवर संशय वाढवू शकतो, असे नमूद करून ही कागदपत्रे तातडीने सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

शिंदेला पोलिसांनी बनावट चकमकीद्वारे ठार केल्याचा आरोप करून या चकमकीची विशेष तपास पथकद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिंदे याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बड्या व्यक्तींना वाचवण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मते मिळवण्यासाठी अक्षयला ठार केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

न्यायालयाचे पाच प्रश्न

१) आरोपीच्या डोक्यात गोळी कशी लागली? हात किंवा पायावर गोळी का झाडली नाही?

२) शिंदे याला पिस्तूल चालवण्याचा पूर्वानुभव होता का?

३) गंभीर गुन्ह्यातील आरोपीला बंदोबस्तात नेले जात असताना पोलीस एवढे निष्काळजी कसे?

४) बंदोस्तासाठीची मार्गदर्शक तत्त्वे आहेत का? शिंदेच्या हातात बेड्या होत्या का?

५) आरोपीने तीन गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी पोलिसाच्या पायाला लागली असेल तर अन्य गोळ्यांचे काय झाले?

‘…तर योग्य ते आदेश’

प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्षपणे झाला नसल्याचे आढळून आले तर आम्हाला आवश्यक ते आदेश द्यावे लागतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. गोळी कशी आणि किती दुरून चालवली गेली? ती आरोपीला नेमकी कुठे लागली आणि कुठून बाहेर पडली, याबाबतचा न्यायवैद्याकीय प्रयोगशाळेचा मोहोरबंद अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. चकमकीत सहभागी सर्व पोलिसांच्या फोनचा तपशील सादर करण्यासह तळोजा तुरुंगातून शिंदे याला बाहेर काढल्यापासून कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात त्याला मृत घोषित केले जाईपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रण जपून ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध शिंदे याच्या वडिलांनी गुन्हा दाखल करण्याबाबत केलेल्या तक्रारीवर पोलीस कधी निर्णय घेणार हेही स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मी १०० वेळा पिस्तुल वापरले आहे. रिव्हॉल्वरने गोळी कोणीही झाडू शकते. पिस्तुलाचे लॉक उघडणे आणि गोळीबार करणे प्रशिक्षणाशिवाय शक्य नाही. पिस्तूल लोड करण्यासाठी ताकद लागते. कमकुवत व्यक्ती ही कृती सहजी करू शकत नाही.न्या. पृथ्वीराज चव्हाण