मुंबई : बाजू न ऐकताच कर्जखाते फसवे असल्याचे जाहीर करणाऱ्या बँकांच्या कृतीबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, कर्जखाते फसवे जाहीर करण्याच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या कारवाईविरोधात प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना रिझर्व्ह बँकेकडे दाद मागण्याचे आदेश न्यायालयाने दिले.कंपनीचे कर्ज खाते फसवे असल्याचे जाहीर करण्याच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या आदेशाविरोधात अंबानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी पक्षकार किंवा कर्जदारांचे म्हणणे न ऐकता कर्ज खाते फसवे असल्याचे जाहीर करणारे आदेश काढणाऱ्या बँकांच्या कारवाईबाबत न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तसेच, याबाबत रिझर्व्ह बँकेच्या वकिलांकडे विचारणा केली. बँका रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता कंपनीच्या खात्यांना फसवी खाती म्हणून घोषित करत असल्याची अनेक प्रकरणे न्यायालयात येत आहेत. या प्रकरणांमध्ये जनतेचा पैसा गुंतलेला आहे. त्यामुळे, बँका पक्षकार किंवा कंपन्यांचे म्हणणे न ऐकता त्यांची खात्यांना फसवी खाती म्हणून घोषित करू शकत नाहीत. सारासार विचार करून याबाबतचा आदेश काढणे आवश्यक आहे, असेही खंडपीठाने सुनावले. तसेच, असे निर्णय घेण्यासाठी एक यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज न्यायालयाने बोलून दाखवली.
कर्जखाती फसवी घोषित करण्यापूर्वीच्या प्रक्रियेबाबत रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत ही बाब बँकांनी कारवाईचा बडगा उचलण्यापूर्वी लक्षात ठेवावी, असे आदेश सहज दिले जाऊ शकत नाही, असे देखील न्यायालयाने म्हटले. तथापि, बँक अधिकाऱ्यांकडून बँक खाती फसवी जाहीर करण्याचे आदेश जाणीवपूर्वक दिले जात असल्याचे प्रतित होते. त्यामुळे, रिझर्व्ह बँकेकडून असे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार नाही, तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत. ते सुरूच राहतील. म्हणूनच या प्रकरणी बँकांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
त्यावर, कोणताही पक्षकार किंवा कंपनीला त्यांच्यावरील कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारी असल्याचे वाटत असल्यास त्यांनी संबंधित बँकेविरोधात आपल्याकडे तक्रार करावी, असे रिझर्व्ह बँकेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. परंतु, तक्रार करण्यात आल्यावर रिझर्व्ह बँक प्रकरणाच्या गुणवत्तेत जाणार नाही, तर आदेश देण्यापूर्वी बँकांकडून अनिवार्य प्रक्रियांचे पालन केले गेले आहे का तेच पाहील, असेही रिझर्व्ह बँकेच्या वतीने वरिष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयाला सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या या स्पष्टीकरणानंतर न्यायालयाने अनिल अंबानी यांना युनियन बँकेच्या कारवाईविरोधात रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करण्याचे आदेश दिले व अंबानी यांच्या तक्रारीने पक्षकारांना तक्रार करण्याची संधी उपलब्ध करण्याचे म्हटले.
दरम्यान, कर्जखाते फसवे जाहीर करण्याबाबत युनियन बँक ऑफ इंडियाने बजावलेल्या दोन कारणे दाखवा नोटिशींना अंबानी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कंपनीचे कर्जखाते फसवे जाहीर करण्याचा आदेश देण्यापूर्वी आपल्याला कोणतीही सुनावणी देण्यात आली नाही. तसेच, आदेशासाठी आधार घेण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रतीही आपल्याला उपलब्ध करण्यात आल्या नाहीत, असा दावा अंबानी यांनी याचिकेत केला होता. अंबानी यांच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने युनियन बँक ऑफ इंडियाला प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.