मुंबई : विधि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना वर्गात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक असतानाही या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचा दावा करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. पुरेशी उपस्थिती नसताना विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळत असल्याच्या आरोपांचे समर्थन करणारा कोणताही ठोस तपशील याचिकाकर्त्यांनी सादर केलेला नाही, असेही न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले. जितेंद्र चौहान विधी महाविद्यालयाच्या पूर्णवेळ प्राध्यापक असलेल्या शर्मिला घुगे यांनी ही याचिका केली होती. परंतु, ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांची आणि विद्यार्थ्यांची नावे सादर करण्यास याचिकाकर्त्या अपयशी ठरल्या आहेत. याचिकाकर्तीने स्वत: शिकवत असलेल्या महाविद्यालयातील अशा विद्यार्थ्यांची नावेही उघड केलेली नाहीत, असेही मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावताना प्रामुख्याने नमूद केले.

कोणत्याही महत्त्वाच्या तपशीलांशिवाय याचिका करण्यात आली आहे. त्यामुळे, ही याचिका विचारात घेतली जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले.तथापि, याचिकाकर्तीने माहिती अधिकार कायद्यांतर्गत अपील दाखल करावे आणि आवश्यक तो तपशील मिळाल्यास नव्याने याचिका दाखल करावी, असेही न्यायालयाने म्हटले.

याचिकाकर्तीचा दावा

मुंबई विद्यापीठाने वर्गात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य केली असतानाही विद्यार्थ्यांकडून या अटीचे उल्लंघन होत होते. विधि अभ्यासक्रमाचे बरेचसे विद्यार्थी हे विधि कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतात. या प्रकरणी महाविद्यालयांकडूनही कठोर कारवाई केली जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या वर्गातील अनुपस्थितीचे प्रमाण वाढल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. याबाबत मुंबई विद्यापीठ, भारतीय वकील परिषद (बीसीआय) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला (युजीसी) अनेक पत्रे पाठवली. युजीसीने विद्यापीठाला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. तथापि, पाठपुरावा करूनही, प्रतिसाद किंवा कारवाईही न केल्यामुळे याचिका केल्याचे याचिकाकर्तीने याचिकेत म्हटले होते.

विधि पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या सीईटीचे प्रवेशपत्र उपलब्ध

विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल)अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन आयडीमधून प्रवेशपत्र डाउनलोड करावे, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे. हे प्रवेशपत्र www. cetcell. mahacet. org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही प्रवेश परीक्षा २८ एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ही परीक्षा संगणक आधारित पद्धतीने (ऑनलाइन) आणि दोन सत्रांमध्ये होणार आहे.उमेदवारांनी वेळेनुसार परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचावे आणि सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन सीईटी कक्षामार्फत करण्यात आले आहे.