उच्च न्यायालयाने चौकशीची मागणी फेटाळली * महानगरदंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल कायम
काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन कालिना परिसरातील कोटय़वधींची मालमत्ता बळवल्याचा आरोप करून या प्रकरणाच्या ‘सीबीआय’ चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावत सिंह यांना दिलासा दिला.
कृपाशंकर यांनी आपल्याला धमकावून आपली कोटय़वधींची मालमत्ता हडप केल्याचा आरोप करणारी याचिका तुलसीदास नायर यांनी केली होती. या प्रकरणाची आणि सिंह यांची सीबीआयद्वारे चौकशी करावी आणि आपल्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नायर यांनी केली होती.
न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी नायर यांची याचिका फेटाळून लावली. नायर यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत न्यायालयाने महानगरदंडाधिकाऱ्यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
सिंह यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप सिद्ध करणारा कुठलाही ठोस पुरावा नायर यांनी सादर केलेला नाही, असे चौकशीदरम्यान पुढे आल्याचा निर्वाळा महानगरदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.
खंडपीठाने महानगरदंडाधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल मान्य करीत नायर यांची याचिका फेटाळून लावली. तसेच नायर यांना याप्रकरणी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे खासगी तक्रार दाखल करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करून त्याच पाश्र्वभूमीवर याचिकेद्वारे केलेली विनंती मान्य करता येऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले.
दरम्यान, न्यायालयाने नायर यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरूच ठेवण्याचे स्पष्ट करीत पोलिसांना नायर यांचे संरक्षण काढून घ्यायचे असल्यास त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा