लग्नाच्या प्रस्तावास नकार देणाऱ्या तरुणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या व्यावसायिकाला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. मात्र हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेता कनिष्ठ न्यायालयाने त्याला सुनावलेली शिक्षा ही अत्यंत कठोर म्हणता येणार नसल्याचे स्पष्ट मतही न्यायालयाने निकाल देताना व्यक्त केले आहे.
विजय चव्हाण असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याला कनिष्ठ न्यायालयाने खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. चव्हाण याचे मोबाइल फोनचे दुकान असून संबंधित तरुणी त्याच्या दुकानात नोकरीला होती. ती त्याला आवडत असल्याने त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र तिने लग्नाला स्पष्ट नकार दिला. विजयचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. दरम्यानच्या काळात विमानतळावर चांगली नोकरी मिळाल्याने या तरुणीने विजयच्या दुकानातील नोकरी सोडली. विमानतळावरील नोकरीमध्ये या तरुणीला बऱ्याचदा रात्रपाळी करावी लागत असे. २५ मार्च २००९ या दिवशीही ती रात्रपाळी करून घरी परतत असताना चव्हाण याने तिला तिच्या घराच्या इमारतीच्या पायऱ्यांवर अडवले. त्या वेळेस तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. ती आपल्यासोबत बोलणेही टाळत असल्याचा संताप येऊन चव्हाण याने तिच्यावर चाकूने वार केले व तेथून पसार झाला. या तरुणीला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आल्याने आणि वेळीच उपचार मिळाल्याने ती बचावली. नंतर चव्हाण याला अटक करण्यात आली. गुन्हा अमान्य केल्याने त्याच्यावर खटला चालविण्यात येऊन कनिष्ठ न्यायालयाने त्याला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवून पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
विशेष म्हणजे खटल्याच्या वेळेस चव्हाण याने दावा केला की, त्याचे आणि संबंधित तरुणीचे प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशीही ती आपल्याशी बोलत असताना काही अज्ञात इसम तेथे आले आणि त्यांनी तिची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. चोरांपासून स्वत:चे संरक्षण करतेवेळी तिच्या मानेवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. परंतु त्याचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. तसेच जर त्याच्या दाव्यात तथ्य असते तर त्याने तिला सर्वप्रथम रुग्णालयात नेले असते, तिची पर्स चोरणाऱ्यांचा प्रतिकार केला असता व पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवली असती. पण त्याने यातील काहीच केलेले नाही, असा निरीक्षणही न्यायालयाने या वेळी नोंदवले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा