पतीचे निधन झाल्यानंतर पुन्हा लग्न करता यावे म्हणून आपल्या नवजात मुलाला दीर व जावेच्या हाती सोपवत घरातून निघून जाणाऱ्या आणि सात वर्षांनंतर पुन्हा मुलावर ताबा सांगणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाने मुलाचा ताबा सोपवण्यास नकार दिला. त्याऐवजी जन्मल्यापासून मुलाचा सांभाळ करणाऱ्या काका-काकूंकडेच मुलाचा ताबा राहील. तेच मुलाच्या हिताचे आहे, असा निकाल न्यायालयाने दिला.
या महिलेचा मोठा मुलगा तिच्यासोबत राहतो, पण धाकटा मुलगा जन्मल्यापासून काका-काकूंकडेच असल्याने या मुलाने तिला कधीच पाहिलेले नाही व त्याला तिच्याबाबत काहीच माहिती नव्हते. सात वर्षांनी या मुलाचा ताबा मागताना जन्मदात्या आईने तो शिकत असलेली शाळा चांगली नाही आणि तत्सम मुद्दे पुढे करून आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने समुपदेशकाच्या मदतीने मुलाचे मन जाणून घेतले. समुपदेशकाने मुलाला जन्मदात्या आईबाबत माहिती दिली आणि त्यांची भेटही घडवून आणली. न्यायालयाने स्वत:ही हा मुलगा, आई, तिचा दुसरा पती आणि मुलाचे काका-काकू यांच्याशी संवाद साधला. त्या वेळेस या मुलाला त्याच्या जन्मदात्या आईला सोपवल्यास सध्याच्या घराशी असलेले त्याचे सगळे बंध तोडले जातील, असे निदर्शनास आले. तसेच हा मुलगा काका-काकूंकडे खूप आनंदात असून त्याचे या कुटुंबाशी आणि भावंडांशी अतूट नाते आहे. त्यामुळे त्याला त्याच्या या कुटुंबापासून तोडून दुसऱ्या कुटुंबासोबत राहण्यास भाग पाडणे हे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे होईल, असा अहवाल समुपदेशकानेही दिला. त्यामुळे मुलाचे हित, त्याचे सुख लक्षात घेत त्याला काका-काकूंकडे राहू देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.