मुंबई : काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून गायकवाड यांनी गेल्यावर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजप उमेदवार वकील उज्ज्वल निकम यांच्याविरुद्धच्या प्रमुख लढतीत गायकवाड यांनी १६ हजार ५१४ मतांनी विजय मिळवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीदरम्यान जाहिरातपत्रकांवर (हँडबिल) मुद्रक आणि प्रकाशकांच्या नावांचा समावेश असणे अनिवार्य आहे, परंतु, त्याबाबतच्या निकषांची पूर्तता गायडवाड यांच्याकडून केली गेली नाही, असा दावा करून या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले आणखी एक उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने सिद्दीकी यांच्या याचिकेवर बुधवारी निर्णय देताना ती फेटाळली.

दरम्यान, गायकवाड यांनी जाहिरातपत्रकांद्वारे खोटी आश्वासने दिल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. तर, याचिकाकर्त्यांचा हा दावा निराधार आहे. कथित खोटी आश्वासने काय होती किंवा जाहिरातपत्रकांतील आश्वासने खोटी आहेत कसा अर्थ लावला जाऊ शकतो हे याचिकेत स्पष्ट केलेले नाही. याचिका अर्थहीन असून आपण नियमांचे उल्लंघन केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा गायकवाड यांच्यावतीने युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला होता. शिवाय, मतांच्या बदल्यात मतदारांना पैसे वाटल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने गायकवाड यांच्यावर केला होता. तसेच एक विद्यमान आमदार पैसे वाटत असल्याची ध्वनिचित्रफितही न्यायालयात सादर केली होती. परंतु, ती ध्वनिचित्रफीत तत्कालीन आमदार झिशान सिद्दीकी यांची असून ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात आहेत. त्यामुळे, याचिकाकर्त्यांचा हा दावाही निरर्थक असल्याचा दावा गायकवाड यांच्यातर्फे करण्यात आला होता व याचिका फेटाळण्याची मागणी करण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court on wednesday rejected petition challenging candidacy of congress leader varsha gaikwad mumbai print news sud 02