मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूककोडींच्या समस्येबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी चिंता व्यक्त केली. तसेच, स्थानक परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांची या समस्येतून सुटका व्हावी यासाठी वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा, असे आदेश न्यायालयाने वाहतूक पोलिसांना दिले.

वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकापासून शासकीय कार्यालयांच्या इमारतींना जोडणाऱ्या आकाशमार्गिकेचे (स्कायवॉक) नव्याने बांधकाम करण्याची मागणी करणारी जनहित याचिका निकाली काढताना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिले. न्यायालयात दिलेल्या आश्वासनानुसार, आकाशमार्गिकेचे काम हाती घेण्यात आले असून ते प्रगतीपथावर असल्याचा दावा महानगरपालिकेच्या वकील ऊर्जा धोंड यांनी केला. महानगरपालिकेच्या या दाव्याबाबत न्यायालयाने वकील असलेले याचिकाकर्ते के. पी. पी. नायर यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी महापालिकेच्या दाव्यात तथ्य असल्याचे सांगून आकाशमार्गिकेच्या बांधकामाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर, न्यायालयाने याचिका निकाली काढली.

हेही वाचा >>>प्रवाशाच्या सतर्कतेमुळे पाच लाख रुपयांची रक्कम मालकाकडे सुपूर्त

दरम्यान, आकाशमार्गिकेचे बांधकाम सुरू असल्यामुळे वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. अरुंद, निमुळता रस्ता त्यातच बेस्ट बसेस, खासगी वाहने आणि रिक्षा चालकांची मुजोरी यामुळे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, पादचाऱ्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी रोज तारेवरची कसरत करावी लागते. शासकीय, निम-शासकीय, खासगी अशी अनेक कार्यालये वांद्रे पूर्व परिसरात आहेत. त्यामुळे, हजारो नागरिकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढत कार्यालये किंवा स्थानक गाठावे लागते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आकाशमार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने आणि योग्य तो तोडगा काढण्याचे आदेश द्यावेत, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली. त्याची दखल घेऊन वाहतूक पोलिसांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याचे आणि वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

प्रकरण काय ?

वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानक ते कलानगर येथे म्हाडा कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पुन्हा आकाशमार्गिका बांधण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. आदेश देऊनही आकाशमार्गिकेचे काम हाती न घेतल्याने न्यायालयाने महानगरपालिकेला फटकारले होते. तसेच, आकाशमार्गिकेचे काम पूर्ण करण्यासाठी १५ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, महानगरपालिका प्रशासनाकडून आकाशमार्गिकेचे काम हाती घेण्यात आले असून ते १५ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, अशी हमी महानगरपालिकेने न्यायालयाला दिली होती.