मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या चौकशी प्रकरणीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी कारवाईपासून अंतरिम दिलासा दिला. न्यायालयाने मुश्रीफ यांना दोन आठवडय़ांसाठी हा दिलासा दिला असून त्यांना अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याच वेळी विशेष न्यायालयानेही मुश्रीफ यांच्या अर्जावर लवकर सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी ईडीने सुरू केलेल्या कारवाईविरोधात मुश्रीफ यांनी सोमवारी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच ईडीने दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची आणि कारवाईपासून अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली होती. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी मूळ प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवशी ईडीने आपले निवासस्थान, कार्यालयांवर छापे टाकल्याचे मुश्रीफ यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू असून आमदार या नात्याने मुश्रीफ अधिवेशनात व्यग्र आहेत. तसेच राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे १२ वर्षांपूर्वीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना आरोपी करत ईडीने आपला ससेमिरा त्यांच्या मागे लावला आहे. कारवाई राजकीय सूडबुद्धीने सुरू असल्याचा दावा मुश्रीफ यांच्या वतीने केला गेला.