मुंबई : मुंबईतील नालेसफाईबाबतच्या न्यायालयीन याचिका व आरोपांचा अडथळा दूर झाला असून पुढील आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरूवात होणार आहे. लहान नाले व भूमिगत गटारे यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आले असून मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांचेही आदेश लवकरच दिले जाणार आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांसाठीही कंत्राटदार निवडीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यासाठीही कार्यादेश दिले जाणार आहेत.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून यंदाही नालेसफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने जानेवारी अखेरीस निविदा मागवल्या. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारे, मिठी नदी यांच्यातील गाळ काढण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या सगळ्या कामांसाठी एकूण २६ विविध निविदा परिमंडळाप्रमाणे मागवण्यात आल्या आहेत. प्रथमच दोन वर्षांसाठी कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या कामांचा खर्च ५४० कोटी होणार आहे. मात्र मिठी नदीतील गाळ काढण्याच्या निविदा प्रक्रियेत एक विशिष्ट अट टाकल्यामुळे या निविदाप्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला होता. तसेच काही कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने कंत्राटदारांची याचिका फेटाळल्यामुळे नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा पालिका प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो. तर १५ टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान आणि १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. ही कामे दरवर्षी मार्च महिन्यात सुरू होतात. त्यासाठी डिसेंबर महिन्यात निविदा मागवल्या जातात. यंदा मात्र या निविदांना उशीर झाला. त्यातच ही निविदा प्रक्रिया वादात सापडल्यामुळे प्रशासनाने सावध पवित्रा घेतला होता. मात्र न्यायालयीन सुनावणीचा अडथळा बाजूला झाल्यामुळे पालिका प्रशासनाने नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
न्यायालयाने कंत्राटदारांची याचिका फेटाळल्यानंतर गेल्या आठवड्यात मुंबई महापालिकेने आर्थिक देकार उघडले असून त्यातील चढ्या दराने निविदा भरणाऱ्या निविदाकारांशी वाटाघाटी करून ते दर खाली आणण्यात आले असून लवकरच मिठी नदीच्या सफाईसाठीही कार्यादेश दिले जातील अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.नालेसफाईसाठी दरवर्षी एका वर्षाकरीता निविदा मागवल्या जातात. यंदा मात्र प्रथमच दोन वर्षांसाठी निविदा मागवल्या जात आहेत. गेल्यावर्षी नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने २५० कोटींचा खर्च केला होता. यंदा दोन वर्षांसाठी मिळून ५८० कोटी रुपयांपर्यंत हा खर्च जाणार आहे. दरवर्षी मिठी नदीसाठी दोन वर्षांचे कंत्राट दिले जाते. मिठी नदीचे दोन वर्षांचे कंत्राटही संपले असून यंदा सर्व नाले व मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी दोन वर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे.
नालेसफाई अंदाजित खर्च
शहर भाग …३९.४५ कोटी
पूर्व उपनगरे …..१४८.३९ कोटी
पश्चिम उपनगरे ….२५७.३५ कोटी
मिठी नदी …९६ कोटी
मुंबईतील मोठे नाले, लहान नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी सुमारे ६८९ किमी आहे. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले, १५०८ लहान नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २०००किमी लांबीची गटारे