मुंबई : पुणे येथील जर्मन बेकरीमध्ये २०१० साली घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या हिमायत बेग याला किती काळ एकांतात ठेवणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी नाशिक तुरुंग प्रशासनाला केली. तसेच, त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

बेग याला सध्या अंडासेल म्हणजेच एकांतात ठेवण्यात आले आहे. गेल्या १२ वर्षांपासून तो या अंडासेलमध्ये आहे. त्यामुळे, त्याला या कक्षातून कठोर सुरक्षा असलेल्या कक्षात हलवता येईल का, असा प्रश्नही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांना केला व त्याबाबत कारागृह विभागाच्या महानिरीक्षकांकडून सूचना घेण्याचे आदेश दिले. अंडासेलमधून अन्यत्र हलवण्याच्या मागणीसाठी बेग याने याचिका केली असून त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.

हेही वाचा…मुंबई : पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार, २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांकडून प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी

बेग याच्या सुरक्षेबाबतची राज्य सरकारची चिंता समजू शकते, परंतु एखाद्या कैद्याला अशा प्रकारे किती काळ तुरुंगात एकाकी ठेवले जाईल. बेग याला ठेवण्यात आलेल्या खोलीत प्रकाश, हवा नाही. त्याला जेवण दिले जात असतानाही बाहेर काढले जात नाही. बेग याला इतर कैद्यांसह ठेवण्यास सांगत नाही, परंतु गेल्या १२ वर्षांपासून बेग याला एकाकी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे, त्याला आणखी किती काळ असे ठेवणार हा प्रश्न आहे. या १२ वर्षांत त्याला बाहेर काढण्यात आलेले नाही. एखाद्याला अनिश्चित काळासाठी असे एकाकी ठेवले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले. तसेच, बेगला इतरत्र अत्यंत सुरक्षित कक्षात हलवण्यात येईल का हे स्पष्ट करण्याचे आदेश तुरूंग प्रशासनाला दिले.