मुंबई : शादी के दिग्दर्शक करण और जोहर’ चित्रपटाचे हे शीर्षक चित्रपट निर्माता करण जोहरच्या व्यक्तिगत अधिकाराचे सकृतदर्शनी उल्लंघन करते, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने शुक्रवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला. इंडियाप्राइड ॲडव्हायझरी, लेखक संजय सिंग आणि दिग्दर्शक बबलू सिंग यांच्याविरोधात करण जोहर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, प्रतिवाद्यांना चित्रपटाच्या शीर्षकात आपले नाव वापरण्यापासून कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर १३ जून २०२४ रोजी न्यायालयाने करण जोहर याच्या बाजूने निर्णय देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनावर अंतरिम स्थगिती दिली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनावरील अंतरिम स्थगिती उठववावी या मागणीसाठी चित्रपट निर्मात्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.

त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठाने चित्रपटावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला. या चित्रपटाच्या शीर्षकाने करण जोहर याच्या व्यक्तिगत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे, आधी दिलेला स्थगितीचा आदेश कायम ठेवला जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

चित्रपटाच्या शीर्षकात दिग्दर्शक शब्दासह करण आणि जोहर ही नावे वापरली आहेत. निर्मात्यांनी करणच्या आरोपांचे खंडन केले आहे. परंतु, आपण चित्रपटाची झलक पाहिली असून करण आणि जोहर ही नावे दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा संदर्भ अधोरेखीत करत नसल्याचेही न्यायालयाने करण जोहर याची याचिका योग्य ठरवताना स्पष्ट केले.