मुंबई : अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शालेय बसच्या चालकाला जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला, अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा हा गंभीर आणि घृणास्पद असल्याचे न्यायालयाने त्याला जामीन नाकारताना स्पष्ट केले. आरोपी शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचा चालक होता आणि त्याच्यावर मुलांना शाळेतून घरी सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, असेही न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल खंडपीठाने त्याला जामीन नाकारताना नमूद केले. आरोपीने बस थांबवणे, पीडित मुलीला एका निर्जन ठिकाणी नेणे आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे हे वर्तन अतिशय गंभीर आणि घृणास्पद गुन्हा आहे, असे देखील न्यायालयाने आदेशात म्हटले.

आपल्याविरूद्ध कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही, असा दावा करून आरोपीने जामिनाची मागणी केली होती. एकलपीठाने मात्र त्याचा हा दावा फेटाळून लावताना त्याला जामीन देण्यास नकार दिला. तसेच, त्याच्याविरोधातील खटला जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश सत्र न्यायालाला दिले.

म्हणून जामीन देण्याची मागणी

मार्च २०२३ पासून आपण तुरुंगात आहोत आणि दोषी आढळल्यास त्याला होऊ शकणाऱ्या कमाल शिक्षेच्या एक तृतीयांश शिक्षेचा कालावधी आपण तुरूंगात घालवला आहे. त्यामुळे, आपल्याला जामीन मंजूर करण्याची मागणी आरोपीने केली होती. तर, आरोपी शालेय बसचा चालक होता आणि त्याने दुसरीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा करून सरकारी वकिलांनी त्याला जामीन देण्यास विरोध केला.

या प्रकरणी दीर्घ तुरूंगवास जामिनासाठीचा आधार नाही

आरोपीवर दाखल असलेला गुन्हा गंभीर असून अवघ्या आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले आहेत, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. तसेच, दीर्घ तुरुंगवासाच्या कारणास्तव एखाद्या आरोपीला जामीन मंजूर करताना देखील त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य विचारात घेणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती जामदार यांनी प्रामुख्याने अधोरेखीत केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करता एका आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या अतिशय गंभीर आणि घृणास्पद गुन्ह्यात आरोपी सहभागी असल्याचे दिसून येते, असेही न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकारा देताना प्रामुख्याने स्पष्ट केले.