दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची जवळची मैत्रीण असलेल्या अनिता अडवाणी यांनी घरगुती हिंसाचार कायद्याखाली अभिनेत्री डिंपल कपाडिया, अभिनेता अक्षय कुमार आणि टि्वंकल खन्ना यांच्याविरोधात महानगरदंडाधिकाऱयांकडे केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. न्यायालयाने याआधीच खन्ना यांची धाकटी मुलगी रिंकी खन्ना हिचे नाव या याचिकेतून वगळले आहे. आता संपूर्ण याचिकाच फेटाळल्यामुळे खन्ना कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
अडवाणी यांनी डिंपल, अक्षय कुमार, टि्वंकल आणि रिंकी अशा चौघांविरुद्ध घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या अन्य कुटुंबीयांनी आपल्याला घरातून हाकलून लावले. तसेच त्यांच्या अत्यंसंस्काराच्या वेळेसही धक्काबुक्की केल्याचा आरोप अडवाणी यांनी केला. शिवाय राजेश खन्ना यांच्या मालमत्तेवरील काही भागावर हक्क सांगत दर महिन्याला देखभाल खर्च आणि वांद्रे येथे तीन खोल्यांचे घर देण्याची मागणी केली. अडवाणी यांच्या तक्रारीची दखल घेत महानगरदंडाधिकाऱ्यांनी डिंपल, अक्षयकुमार, टि्वंकल आणि रिंकी यांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. त्याविरोधात या चौघांनी उच्च न्यायालयात धाव घेत अडवाणी यांनी घरगुती हिंसाचाराप्रकरणी केलेली तक्रार रद्द करण्याची मागणी केली होती.
खन्ना यांचे कुटुंबीय खन्ना यांच्यासोबत राहत नव्हते. त्यामुळे अडवाणी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत त्यांच्याविरुद्ध तक्रार करू शकत नाही आणि मालमत्तेत हक्क मागता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद खन्ना कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरीत अडवाणी यांची याचिका फेटाळली. न्यायमूर्ती एम. एल. टहलियानी यांनी, अडवाणी या राजेश खन्ना यांच्यासोबत ‘लिव्ह इन पार्टनर’ म्हणून राहात होत्या. त्यामुळे त्या घरगुती हिंसाचाराचा खटला खन्ना कुटुंबीयांविरोधात दाखल करू शकत नाही, असे सांगितले.

Story img Loader