मुंबई : लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय दीना पाटील यांच्या खासदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देणारी निव़डणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. याचिकेच्या गुणवत्तेत न जाता याचिका सुनावणीयोग्य कशी या मुद्यावर याचिकाकर्ते आणि या मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार शहाजी थोरात यांना युक्तिवाद करण्यास सांगण्यात आले होते. तसेच, निवडणूक याचिकेसाठी इतर उमेदवारांनाही प्रतिवादी करणे अनिवार्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परंतु, याचिकाकर्त्याने इतर १८ उमेदवारांना प्रतिवादी केले नव्हते. याशिवाय, याचिकाकर्त्याने सुनावणीवेळी कोणत्याही वकिलाची मदत घेतली नव्हती. त्यांनी स्वत: युक्तिवाद केला. त्याचप्रमाणे, सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते थोरात यांनी इतर १८ उमेदवारांना प्रतिवादी करण्याची मागणी करणारा अर्ज केला. परंतु, निवडणूक याचिका फेटाळून लावू नये यासाठी त्यांनी ही मागणी केली होती, असे न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने थोरात यांची याचिका फेटाळून लावताना नमूद केले.

व्यवसायाने टॅक्सी चालक असलेल्या थोरात यांनी निवडणूक याचिकेच्या माध्यमातून संजय दीना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान दिले होते. निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना वडिलांच्या नावासह आईचे नाव नमूद कऱणे आवश्यक आहे. मात्र, पाटील यांनी उमेदवारी अर्जात आपल्या आईचे नाव नमूद केले नाही. हे नियमावलींचे उल्लंघन असून पाटील यांची खासदारकी यामुळे अवैध ठरत असल्याचा दावा थोरात यांनी केला होता. त्यांच्या दाव्याला पाटील यांच्यातर्फे विरोध करण्यात आला. दरम्यान, पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा २९, ८०० मतांच्या फरकाने पराभव केला होता. खासदार म्हणून पाटील हे दुसऱ्यांदा निवडणून आले. त्याआधी २००९ मध्ये त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पराभव केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court rejected petition challenging sanjay dina patils candidature in mumbai north east mumbai print news sud 02