मुंबई : चोवीस तास सुविधा देणाऱ्या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा होतो. शिवाय, कायद्याने या दुकानांवर वेळेचे निर्बंध नाहीत. त्यामुळे, ती चोवीस तास सुरू राहू शकतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. तसेच, रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने बंद करण्याची सक्ती न करण्याचे आदेशही न्यायालायने पुणे पोलिसांना दिले.
सुविधा देणारी दुकाने चोवीस तास सुरू ठेवण्याची संकल्पना जगभरात लोकप्रिय आहे. या अशा दुकानांमुळे ग्राहक कोणत्याही क्षणी सहज खरेदी करू शकतात. नियमित वेळांमध्ये काम न करणाऱ्यांसाठी ही दुकाने खूपच महत्त्वाची ठरतात, असेही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले. या दुकानांमुळे ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढतो. परिणामी, अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते. ही बाब आपल्यासारख्या बेरोजगारीच्या समस्येचा सामना करणाऱ्या मोठ्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हेच फायदे ओळखून आणि जागतिक मानकांनुसार प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारने अशा दुकानांवर वेळेचे निर्बंध घातलेले नाहीत, असेही न्यायालयाने प्रामुख्याने अधोरेखीत केले.

पुण्यातील हडपसर भागात ‘द न्यू शॉप’ चालवणाऱ्या अॅक्सिलरेट प्रॉडक्टएक्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उपरोक्त निर्वाळा दिला. अशा दुकानांवर कायद्याने वेळेचे निर्बंध घातलेले नाही. तसेच, चोवीस तास सुविधा देणारी दुकाने रात्रभर सुरू ठेवली जाऊ शकत नाही, असे कोणत्याही कायद्यात म्हटलेले नाही. असे असताना स्थानिक पोलिसांकडून बेकायदेशीररीत्या आणि मनमानी पद्धतीने कंपनीला रात्री ११ वाजेपर्यंत दुकान बंद करण्यास भाग पाडले जाते, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. तर, वेळेच्या निर्बंधांमुळे ‘गैरसमज’ निर्माण झाला होता आणि याचिकाकर्त्याला कायदेशीर कृती करण्यापासून रोखण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा पोलिसांनी केला होता.

म्हणून सिनेमागृह रात्रभर सुरू ठेवण्यासही परवानगी

कंपनीचे म्हणणे न्यायालयाने योग्य ठरवले. तसेच, महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (सेवेचे नियमन आणि सेवाशर्ती) कायद्यांतर्गत हुक्का पार्लर, परमिट रूम, डान्स बार आणि/किंवा मद्यविक्री उपलब्ध करणाऱ्या रेस्टॉरंट्ससारख्या आस्थापनांचा अपवाद वगळता २४ तास सेवा देणाऱ्या दुकानांवर आठवड्याचे सातही दिवस सुरू ठेवण्यावर बंधने नसल्याचे स्पष्ट केले. सरकारने २०२० मध्ये सिनेमागृह २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती याकडेही न्यायालयाने ही बाब स्पष्ट करताना लक्ष वेधले. त्यामुळे, पोलीस याचिकाकर्त्यांना त्यांचे दुकान सुरू ठेवण्यावर कोणतेही निर्बंध घालू शकत नाहीत. तसेच, रात्री ११ नंतर कंपनीला दुकान बंद करण्यास भाग पाडू शकत नाही, असेही न्यायालयाने पुणे पोलिसांना बजावले.