मुंबई : बॉडी मसाजसाठी वापरली जाणारी उपकरणे ही सेक्स टॉय म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही. तसेच, आयात करण्यास मनाई असलेल्या वस्तूंच्या यादीतही त्याचा समावेश केला जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, बॉडी मसाज करणारी उपकरणे जप्त करण्याचा सीमाशुल्क विभागाने दिलेला आदेश न्यायालयाने रद्द केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉडी मसाजसाठीच्या उपकरणांचा वापर सेक्स टॉय म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे, अशी उपकरणे आयात करण्यास मनाई आहे, असा दावा करून सीमाशुल्क आयुक्तांनी ही उपकरणे जप्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, बॉडी मसाजसाठीच्या उपकरणांचा वापर सेक्स टॉय म्हणून केला जाऊ शकतो हे सीमाशुल्क आयुक्तांच्या कल्पनेतून आलेले आहे, अशी टिप्पणी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाने केली. एवढेच नव्हे, तर सीमाशुल्क आयुक्तांनी काढलेला निष्कर्ष विचित्र, आश्चर्यकारक असल्याचा टोलाही खंडपीठाने केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर अपिलीय न्यायाधिकरणाच्या आदेशाला आव्हान देणारी सीमाशुल्क विभागाची याचिका फेटाळताना हाणला.

हेही वाचा…मुंबई : मालाड येथील मालवणीमध्ये तिघे गटारात कोसळले; दोघांचा मृत्यू

बॉडी मसाजसाठीच्या उपकरणांचा देशांतर्गत बाजारपेठांत व्यापार केला जातो आणि त्या प्रतिबंधित वस्तू मानल्या जात नाहीत. त्यामुळे, बॉडी मसाजसाठीची उपकरणे ही निषिद्ध वस्तू असल्याची सीमाशुल्क आयुक्तांची कल्पना अथवा त्यांची वैयक्तिक धारणा असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. सीमाशुल्क आयुक्त विवेकी अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षणही न्यायालयाने न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवताना नोंदवले.

हेही वाचा…रेल्वेचा भूखंड ताब्यात न आल्याने धारावी पुनर्विकासात अडसर!

दरम्यान, सीमाशुल्क आयुक्तांनी एप्रिल २०२२ मध्ये निर्णायक अधिकारी म्हणून बॉडी मसाजसाठी वापरली जाणारी उपकरणे सेक्स टॉय असल्याचे नमूद केले होते. तसेच, जानेवारी १९६४ च्या सीमाशुल्क अधिसूचनेनुसार ही उपकरणे आयात करण्यास मज्जाव असल्याचे नमूद करून ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांच्या या आदेशाविरोधात उपकरण उत्पादकांनी अपिलीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. न्यायाधिकरणाने मे २०२३ मध्ये सीमाशुल्क आयुक्तांचे आदेश रद्द केले व आदेशावर ताशेरेही ओढले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court said body massage devices not considered sex toys cannot be confiscated mumbai print news psg