खड्डय़ांप्रकरणी न्यायालयाने पालिकेला बजावले

मुंबईकर मूकपणे सगळे सहन करत असतात. खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्येकडेही ते त्यामुळेच दुर्लक्ष करतात. मात्र त्यांच्या या सहनशक्तीचा अंत पाहू नका, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मंगळवारी पालिकेला पुन्हा एकदा धारेवर धरले. तसेच यंदा तरी पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर खड्डे बुजवा, असे न्यायालयाने पालिकेला बजावले आहे.

न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस खड्डय़ांच्या तक्रारीसाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली, परंतु पालिकेचे ‘फेसबुक पेज’ मार्चपासून कार्यान्वित असून नागरिकांना खड्डय़ांच्या तक्रारी त्यावर करता येतील, असा दावा पालिकेतर्फे अ‍ॅड्. अनिल साखरे यांनी केला. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीचे त्यातही मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम मेअखेरीपर्यंत पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला. त्यावर न्यायालयाने पालिकेला पुन्हा एकदा धारेवर धरले. पावसाळ्यातील मुख्य समस्या म्हणजे सर्वत्र रस्ते खोदून ठेवले जातात आणि ते पूर्ववतही केले जात नाही.

मुंबईकर मूकपणे सगळे सहन करतात आणि या समस्येकडेही ते दुर्लक्ष करतात, परंतु त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तर पावसाळ्यापूर्वी खड्डे युद्धपातळीवर बुजवा, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच या प्रकरणी न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘अमायकस क्युरीं’नाही न्यायालयाने याबाबत आवश्यक त्या शिफारशी सुचवण्याची सूचना केली आहे. तर तक्रार निवारण यंत्रणेसाठी काय उपाययोजना केल्या याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.

Story img Loader