लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : बदलापूर येथील शाळेतील दोन बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीच्या तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाने सोमवारी बोट ठेवले. या तपासाबाबत राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) गंभीर नसल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने तपास पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली.
या प्रकरणाचा तपास सीबीआयडीकडून गांभीर्याने केला जात नसल्याचे त्यातील असंख्य त्रुटींवरून दिसून येते. किती काळ या त्रुटींचे समर्थन करणार, अशा शब्दांमध्ये न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तपासातील त्रुटी आणि विलंबामुळे शिंदे याच्या कोठडीतील मृत्यूच्या चौकशीचा अहवाल न्यायदंडाधिकारी अद्याप सादर करू शकले नसल्याचेही न्यायालयाने सुनावले.
आणखी वाचा-अँटिलिया स्फोटके आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण : आरोपी सुनील माने यांना जामीन नाहीच
शिंदे याने पोलिसांचे पिस्तुल हिसकावून त्यातून पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या आणि त्याला पोलिसांनी प्रत्युतरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला, असा पोलिसांना दावा आहे. परंतु, शिंदे याने गोळ्या झाडल्यानंतर त्याच्या हातावर त्याबाबतच्या खुणा आढललेल्या नाहीत. शिवाय, त्याला गोळीबाराआधी पिण्याच्या पाण्याची बाटली देण्यात होती. त्या बाटलीवरदेखील त्याच्या हाताचे ठसे आढळून आले नाही. हा सगळा प्रकार असामान्य आहे अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
आम्हाला निष्पक्ष चौकशी अपेक्षित आहे. सत्याचा शोध घेणे आणि त्यासाठी तपास योग्यरीत्या सुरू आहे की नाही यावर देखरेख ठेवून आवश्यक ते सगळे पुरावे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर केले जावे हा आमचा प्रयत्न आहे. -उच्च न्यायालय