गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांचा खिसा कुरतडत असलेल्या महागाईने ऐन दिवाळीच्या तोंडावर अधिक उग्र रूप धारण केले असून कांद्यापासून भाज्यांपर्यंत आणि डाळींपासून तेलापर्यंत सर्वच खाद्यमालाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कांदा, भाज्या यांच्या दरवाढीने रोजच्या जेवणाच्या चवीवरही संक्रांत आणली असतानाच रवा, तेल, मैदा, पोहे, शेंगदाण्याच्या दरवाढीमुळे दिवाळीच्या फराळाची लज्जतही गमावण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. जीवनावश्यक वस्तूंपाठोपाठ इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दरांनीही उचल खाल्ल्याने दिवाळीच्या मुहूर्तावरील खरेदीलाही चाप बसणार आहे.
रोजच्या जेवणाचा भाग असलेल्या तूर, मुग आणि उडीदाच्या डाळींनी किरकोळ बाजारात शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांचे आधीच दिवाळे निघू लागले आहे. राज्य सरकारच्या हस्तक्षेपानंतरही भाजीपाल्यांचे दर चढेच असून सुक्या कांद्याने तर पुन्हा मंगळवारपासून सत्तरी ओलांडली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत गहू, ज्वारी, तांदूळ यासारख्या धान्यांच्या किंमतीही महागल्या आहेत.  अशातच सुर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किंमतीही पंधरवडय़ापासून किलोमागे १५ ते २० रुपयांनी वाढल्याने दिवाळी फराळातले तळणीचे पदार्थ बनविणेही महागात पडणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाजीपाल्याच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू असले तरी अन्नधान्याच्या किंमती मात्र स्थिर होत्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून डाळींच्या किंमतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून आवक स्थिर असतानाही घाऊक बाजारात डाळींच्या किंमती कशा महागल्या याचा अभ्यास सुरु आहे, अशी माहिती मुंबई कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रमोद जिरापुरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
महिनाभरापूर्वी ५५ ते ७५ रुपये किलो या दराने विकली जाणारी तूरडाळ ६० रुपयांपासून थेट ९० रुपयांच्या घरात पोहोचली असून किरकोळ बाजारात हेच दर १२० रुपयांपर्यत पोहोचल्याने पोषक प्रथिनांचा पुरवठा करणारी ही डाळ सर्वसामान्यांसाठी दिवास्वप्न ठरु लागली आहे. इतर डाळींनाही चढय़ा दरांचे हे गणित तंतोतंत लागू पडू लागले आहे.

‘फराळ’ महागणार
एकीकडे डाळींच्या किंमतींनी टोक गाठले असताना रवा (४०), बेसन (९०), मैदा (३६) यासारख्या दिवाळी फराळासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे दरही वाढू लागले आहेत. उत्तम प्रतीच्या शेंगदाण्याचे घाऊक बाजारातील दर किलोमागे ६५ ते ८० रुपयांपर्यत तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या किराणा बाजारात १४० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. साखरेचे (३६ ते ३७) दर मात्र स्थिर असून सर्वसामान्यांसाठी हा दिलासा ठरला आहे. वनस्पती तसेच शेंगदाणा तेलाच्या किंमतीही दोन महिन्यांच्या तुलनेत किलोमागे २० रुपयांपर्यत वाढल्या असून गेल्या दोन वर्षांची तुलना करता शेंगदाणा तेलाच्या किंमती किलोमागे तब्बल ४० ते ५० रुपयांची वाढल्या आहेत, अशी माहिती एपीएमसीमधील वरिष्ठ सुत्रांनी लोकसत्ताला दिली. गरीबांचे धान्य अशी ओळख असणाऱ्या ज्वारीच्या किंमती गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा वाढू लागल्या असून घाऊक बाजारात ३७ रुपयांपर्यत उडी घेतली आहे. उत्तम दर्जाचा वाडा-कोलम तांदूळ किरकोळ बाजारात ६० रुपयांवर गेला असून घाऊक बाजारातही तांदळाच्या किंमतीत वाढ झाल्याचे एपीएमसीचे उपसचिव जिरापुरे यांनी सांगितले.

नागपूरमध्ये कांदा वधारला, डाळी स्थिर
नागपूर : नागपुरात किरकोळ बाजारात कांदा ६० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे. नागपुरात डाळींचे दर स्थिर आहेत. तूर डाळ ६० ते ७० रु. प्रती किलो, चणा डाळ ५० ते ६०, मसूर डाळ ५५ ते ६०, मूग  डाळ ७५ ते ८५, उडीद डाळ ५० ते ६० रुपये दराने उपलब्ध आहे. भाजीपाला दरात चढ उतार होत असल्याचे दिसून येते. किरकोळ बाजारात फुलकोबी ६० रुपये प्रति किलो असून पत्ताकोबी ४० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येते. गेल्या आठवडय़ात टोमॅटो ८० रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचले होते. त्यात आता १० ते २० रुपयाची घसरण झाली आहे. भेंडी ४० रुपये, लौकी ६० रुपये, वांगे ४०, काकडी ३० रुपये, सिमला मिरची ८० रुपये, गाजर ४० रुपये, चवळी ६० रुपये, कारले ६० रुपये, तोंडली ४० रुपये, मेथी ८० रुपये, पालक ४० रुपये, दोडके ६० रुपये, कोहळं ३० रुपये किलोप्रमाणे किरकोळ बाजारात उपलब्ध आहे.

‘मुंबईची परसबाग’ही महागाईच्या कचाटय़ात
नाशिक : उन्हाळ्यात टंचाईमुळे कडाडलेले भाजीपाला व कडधान्याचे भाव एरवी मुबलक पाऊस झाल्यानंतर कमी होतात. परंतु यंदा असे काहीही झालेले नाही. मागील सहा महिन्यांपासून परिस्थितीत बदलच झाला नसल्याने महिला वर्गाचे अंदाजपत्रक पार बिघडले आहे. किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांचे दर पराकोटीला पोहोचल्याने खरेदी करताना कोणालाही विचार करणे क्रमप्राप्त ठरते. नवरात्रोत्सवात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान केले. परिणामी, भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने हे दर वधारल्याचे व्यावसायिक अमोल बोडके यांनी नमूद केले. वर्षभरापूर्वी १५ ते ५० रूपयांच्या दरम्यान राहणाऱ्या सर्वच भाज्यांचे भाव आज जवळपास दुप्पट ते तिपटीने वाढले आहेत. एक किलो कांद्यासाठी ६० ते ७० रूपये मोजावे लागत आहेत. या एकूणच स्थितीचा सामना करताना महिलांनी पर्यायी मार्ग म्हणून कडधान्य, डाळी यांच्यावर भर देण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यांचेही दर ६० ते १०० रूपयांवर गेले आहेत.

कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्यांची नफेखोरी
कोल्हापूर : कांदा-बटाटय़ापासून ते वांगी-टोमॅटो-कोबीपर्यंतच्या पालेभाज्या आणि सफरचंद, संत्री, मोसंबी, चिकू अशा फळांचे बाजारातील दर चढे राहिले आहेत. सप्टेंबर महिन्यातील भाजीपाला, फळे, गूळ अशा विविध मालांचा असलेला दर आणि ऑक्टोबर महिन्यातील अलीकडच्या काळातील दर याचे तुलनात्मक अवलोकन केल्यास दरामध्ये वाढ झाल्याचेच दिसून येत आहे. दसरा-दिवाळीचे निमित्त साधून व्यापाऱ्यांनी नफेखोरी सुरू केली असल्याचे दिसत आहे. तर व्यापाऱ्यांच्या मते बाजारातील मालांची आवक व जावक याचा परिणाम दरावर होत आहे.

Story img Loader