गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांचा खिसा कुरतडत असलेल्या महागाईने ऐन दिवाळीच्या तोंडावर अधिक उग्र रूप धारण केले असून कांद्यापासून भाज्यांपर्यंत आणि डाळींपासून तेलापर्यंत सर्वच खाद्यमालाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कांदा, भाज्या यांच्या दरवाढीने रोजच्या जेवणाच्या चवीवरही संक्रांत आणली असतानाच रवा, तेल, मैदा, पोहे, शेंगदाण्याच्या दरवाढीमुळे दिवाळीच्या फराळाची लज्जतही गमावण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. जीवनावश्यक वस्तूंपाठोपाठ इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दरांनीही उचल खाल्ल्याने दिवाळीच्या मुहूर्तावरील खरेदीलाही चाप बसणार आहे.
रोजच्या जेवणाचा भाग असलेल्या तूर, मुग आणि उडीदाच्या डाळींनी किरकोळ बाजारात शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांचे आधीच दिवाळे निघू लागले आहे. राज्य सरकारच्या हस्तक्षेपानंतरही भाजीपाल्यांचे दर चढेच असून सुक्या कांद्याने तर पुन्हा मंगळवारपासून सत्तरी ओलांडली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत गहू, ज्वारी, तांदूळ यासारख्या धान्यांच्या किंमतीही महागल्या आहेत. अशातच सुर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किंमतीही पंधरवडय़ापासून किलोमागे १५ ते २० रुपयांनी वाढल्याने दिवाळी फराळातले तळणीचे पदार्थ बनविणेही महागात पडणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाजीपाल्याच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू असले तरी अन्नधान्याच्या किंमती मात्र स्थिर होत्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून डाळींच्या किंमतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून आवक स्थिर असतानाही घाऊक बाजारात डाळींच्या किंमती कशा महागल्या याचा अभ्यास सुरु आहे, अशी माहिती मुंबई कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रमोद जिरापुरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
महिनाभरापूर्वी ५५ ते ७५ रुपये किलो या दराने विकली जाणारी तूरडाळ ६० रुपयांपासून थेट ९० रुपयांच्या घरात पोहोचली असून किरकोळ बाजारात हेच दर १२० रुपयांपर्यत पोहोचल्याने पोषक प्रथिनांचा पुरवठा करणारी ही डाळ सर्वसामान्यांसाठी दिवास्वप्न ठरु लागली आहे. इतर डाळींनाही चढय़ा दरांचे हे गणित तंतोतंत लागू पडू लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा