ओव्हल मदान ते विरार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल हे उन्नत रेल्वेमार्ग आणि विरार ते पनवेल जोडमार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने रेल्वे स्टेशन आणि रेल्वेच्या भूखंडाच्या विकासासाठी जास्तीत जास्त चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची हमी देणारा सामंजस्य करार त्वरित करावा, अशी मागणी रेल्वेने आज राज्य सरकारकडे केली. मात्र या प्रकल्पासाठी वाढीव चटईक्षेत्र देण्याची लेखी हमी मागून या अवाढव्य प्रकल्पांची धोंड रेल्वेने राज्य सरकारच्या गळ्यात टाकली आहे. त्यावर या प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा एक गट स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येला वाढीव सुविधा उपलब्ध करण्यासाठी रेल्वेच्या वतीने राबविण्याच्या पायाभूत सुविधांबाबतचे सादरीकरण आज चव्हाण यांच्यासमोर झाले. मध्य तसेच पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी उन्नत रेल्वे मार्गाच्या संभाव्य प्रकल्पांचे सादरीकरण करताना ओव्हल मैदान ते विरार हा प्रस्तावित उन्नत रेल्वेमार्ग ६३ कि.मी. लांबीचा असून त्याची किंमत २० हजार कोटी असल्याचे सांगितले. या मार्गातील १६.६ कि.मी.चा मार्ग भूमिगत तर ३६.४ कि.मी.चा मार्ग उन्नत असेल तसेच १० कि.मी.चा मार्ग समपातळीवर असेल. त्यामुळे या प्रकल्पासाठी अतिशय अल्प प्रमाणात भूसंपादन करावे लागणार असल्याचे जैन यांनी सांगितले.
तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावरील वेगवान मार्गाचे (फास्ट कॉरिडॉर) सादरीकरणही यावेळी करण्यात आले. हार्बर रेल्वेवर सीएसटी ते पनवेल हे अंतर पार करण्यासाठी सध्या एक तास १७ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र नवी मुंबईचा विस्तार, जवाहरलाल नेहरू बंदर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक संस्था तसेच नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे या मार्गावरील प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन फास्ट कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्तावित मार्ग सध्याच्या हार्बर मार्गाला समांतर असेल. एकूण मार्गापकी ३१.६ कि.मी. मार्ग उन्नत तर १२.४ कि.मी. समांतर असेल. तसेच नवी मुंबई विमानतळाकडे जाणारा ८.५ कि.मी. चा फाटाही प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्गासाठी अत्यल्प भूसंपादनाची गरज भासणार आहे. तसेच मानखुर्द ते वडाळा या दरम्यान काही झोपडीवासीयांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. या मार्गावरील गाड्यांचा संभाव्य कमाल वेग ११० कि.मी. प्रतितास तर सरासरी वेग ६० कि.मी. प्रतितास असेल. सीएसटी ते पनवेल हे अंतर पार करण्यासाठी या मार्गावरून ५० मिनिटे लागतील. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत १४ हजार कोटी रुपये असून हे प्रकल्प खाजगी, सार्वजनिक सहभागातून राबविण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी राज्य सरकारने रेल्वे स्थानके आणि प्रकल्पाशी सलग्न भूखंडाच्या विकासासाठी वाढीव चटईक्षेत्र निर्देशात द्यावा. तसेच त्यातूनही प्रकल्पासाठी निधीची गरज भासल्यास वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची तयारी असल्याचा सामंजस्य करार करावा अशी मागणी यावेळी रेल्वेने केली.
अतिवेगवान मार्गाचा प्रस्ताव
राज्य सरकारनेही या वेळी रेल्वेला मुंबई-पुणे-नागपूर अशा हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव रेल्वेला सादर केला. आणि या प्रकल्पाबाबत रेल्वेनेही सकारात्मक विचार करावा असे सांगितले. जर्मनीच्या वोसिंग इंजिनिअरिंग कंपनीने हा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अत्यंत प्राथमिक स्वरूपाचा असून लवकरच त्याचा शक्याशक्यता अहवाल तयार करण्याबाबत विचार केला जाईल. मुंबई ते नागपूर अशा ८८५ कि.मी. लांबीचा हा मार्ग असून यावरुन प्रतितास ३५० कि.मी. या कमाल वेगाने गाड्या धावतील. हे अंतर कापण्यास सुमारे साडेचार तास एवढा वेळ लागेल. हा मार्ग मुंबई-पुणे-नगर-बीड असा जाणार असून त्यावरून मालवाहतूकही होईल. मात्र प्रकल्पाची किंमत अवाढव्य असल्यामुळे पहिल्या टप्यात केवळ मुंबई-पुणे मार्गाचाच विचार करावा असे यावेळी रेल्वेला सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा