मुंबई : व्यवसाय-कार्यालयाच्या ठिकाणी किंवा गृहनिर्माण सोसायटीमध्ये किमान २५ किंवा त्याहून अधिक वाहनमालकांनी शिबीर आयोजित करून एकत्रित नोंदणी केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येणार आहे.

ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांनी वैयक्तिकरित्या होम फिटमेंट सर्विस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी संचासह बसविण्याचे जीएसटी वगळून शुल्क दुचाकी वाहने व ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये, तीन चाकी वाहने ५०० रुपये, हलकी वाहने, प्रवासी कार, मध्यम व जड वाहने ७४५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या शुल्काशिवाय इतर कुठलेही शुल्क घेण्याची परवानगी नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या यासंदर्भात ०२२-२०८२६४९८ या क्रमांकावर आणि hsrpcomplaint. tco@gmail. com या ईमेलवर तक्रारी कराव्यात, असे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.