वरळीत वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयात सुसज्ज आणि अद्यायावत ‘मल्टिमीडिया केंद्र’ सुरु

बुधवार दुपारची साडेतीनची वेळ.. मुंबईतल्या एका मुख्य रस्त्यावरील सिग्नलवर दुचाकी थांबते. या तरुणाने हेल्मेट घातले आहे, सिग्नल लागला तेव्हा शिस्तीत थांबलाही आहे.. पण, जबाबदार वाहनचालक असण्यासाठी केवळ इतकेच पुरेसे नाही. कारण, वाहतूक पोलिसांचा डोळा चुकविला असला तरी सिग्नलवरचे ‘झेब्रा क्रॉसिंग’ ओलांडून त्याने दुचाकी थांबवली होती, हे त्याच्यापासून २० मीटर लांब असलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटलेले नसते. त्या कॅमेऱ्याने त्याचा फोटो टिपलेला असतो आणि वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरण्यासाठी त्याला ई-चलानही जारी झालेले असते. दंड भरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आलेला लघू संदेश येईल तेव्हा नेमक्या कुठल्या सिग्नलला आपण झेब्रा क्रॉसिंग ओलांडले, हेदेखील त्याच्या लक्षात येणार नाही.

ही करामत केली आहे मुंबईवर वर्षांचे ३६५ दिवस, चोवीस तास लक्ष ठेवून असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी. गांधी जयंतीच्या दिवशी शहरात कार्यरत झालेल्या सुमारे ४७०० कॅमेऱ्यांमुळे जवळपास ८० टक्के मुंबईवर एका जागी बसून लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य होणार आहे. केवळ वाहतुकीच्याच नव्हे तर सुरक्षेच्या कारणांमुळेही हे कॅमेरे पोलिसांच्या ‘तिसरा डोळ्या’ची जबाबदारी पार पाडणार आहेत. या हजारो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण एकाच ठिकाणाहून म्हणजे वरळीतील वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयाच्या ‘मल्टिमीडिया केंद्रा’तून केले जाते. केंद्राच्या अत्याधुनिक संगणकांनी सुसज्ज व भव्य वातानुकूलित दालनात जवळपास ६० तरुण पोलीस कर्मचारी व अधिकारी या ४ हजार ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मुंबईवरील वाहतुकीवर नजर ठेवून आहेत.

या कर्मचाऱ्यांचे काम एकच, प्रमुख चौकांत, सिग्नलच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहनचालकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन डोळ्यात तेल घालून टिपणे! नियम मोडणाऱ्या प्रत्येकाच्या वाहनाचा क्रमांक ‘झूम’ करून त्याचा फोटो घेत सेव्ह करण्यात येत होता. हे करणारी मंडळी जरी पोलीस असली तरी एखाद्या आयटीतज्ज्ञाप्रमाणे सराईतपणे त्यांची बोटे संगणकाच्या कळफलकावरून फिरत होती. कोणतीही धांदल उडू न देता शांतपणे हे कर्मचारी आपल्यासमोरील भव्य स्क्रीनवरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण करत होते. त्यामुळे ‘वॉर रूम’चे स्वरूप या ‘मल्टिमीडिया केंद्रा’ला आले आहे.

प्रथम सीसीटीव्हींमार्फत येणाऱ्या चित्रणाची उकल करण्याचे काम २० जण करतात.

या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या संगणकावर चार वेगवेगळ्या ठिकाणचे सिग्नल पाहण्याचे काम एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे एकावेळी सहज ८० सिग्नलवरील परिस्थितीची पाहणी करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची छायाचित्रे साठविली जात होती. शहरातील संपूर्ण सिग्नलची पाहणी आलटून-पालटून करण्यात येते. काही ठिकाणी मुंबईतील बेशिस्त वाहनचालक सिग्नल व झेब्रा क्रॉसिंग ओलांडताना दिसत होते, तर अनेक चारचाकी वाहनचालक सीट बेल्ट न लावता फोनवर बोलत होते. दुचाकी चालकही हेल्मेट न घालता तीन जणांना पाठी बसवून फिरताना दिसले. मुंबईच्या कानाकोपऱ्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी मंडळी या मल्टिमीडिया केंद्राच्या डोळ्यांतून मात्र सुटत नव्हती.

मुंबईत ९० स्पाय कॅमेरे

मुंबईतील अनेक ठिकाणे ही सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने अशा ठिकाणीही हे कॅमेरे उभारण्यात आले आहेत. यात दक्षिण मुंबईतील किनारी भागातील संरक्षण ठिकाणे तसेच शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये २० स्पाय कॅमेरे, रात्री लक्ष ठेवण्यासाठी २० थर्मल कॅमेरे व फिरत्या मोबाइल वाहनांचा समावेश आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांबरोबर संशयास्पद हालचाली , संशयित वाहनांचा माग तसेच गुन्हेगारांवर लक्ष ठेवता येणार आहे.

एमटीपी मोबाइल अ‍ॅप

मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांचे ‘एमटीपी’ हे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. गुगल प्ले-स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध असून नागरिकांना या अ‍ॅपवर वाहतुकीबाबतची ताजी माहिती मिळणार आहे. तसेच एखाद्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला असेल आणि त्याच परिसरात हे अ‍ॅप असलेला मोबाइलधारक असल्यास त्याला तात्काळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती लघू संदेशाद्वारे मिळू शकेल. तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास नेमका किती दंड भरावा लागेल याची माहितीदेखील अ‍ॅपवर असून, अ‍ॅपद्वारे वाहनचालकांना इच्छित रस्त्यावर पोहचण्यासाठीचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच अन्य समाजमाध्यमांवर प्रवाशांशी संपर्क साधण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अ‍ॅपवर देण्यात आलेल्या क्रमांकावर प्रवाशांना व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवता येईल अथवा थेट फोन करून या कर्मचाऱ्यांशी बोलून तक्रार सांगता येईल. तसेच ज्यांनी ट्विटरवर वाहतुकीच्या प्रश्नांसंबंधी तक्रारी केल्या आहेत, त्यांचीदेखील या केंद्रातून दखल घेतली जाईल, अशी माहिती केंद्रातील सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र राणे यांनी दिली.

Story img Loader