एका दिवसाचा अपवाद वगळता ऑक्टोबर महिना ‘हीट’विना संपत असतानाच दिवाळी पहाटेला गारवा असण्याची सुखद शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. गेले सहा दिवस कमाल तापमानात घट होत असतानाच दोन दिवसांपासून रात्रीच्या तापमानातही घट होण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही दिवस हा बदल कायम राहील.
दिवाळी पहाट ही थंडीशी जोडली गेली आहे. यावर्षी पहिल्या आंघोळीला कडाक्याच्या थंडीची सोबत नसली तरी वातावरणात गारवा असेल. गेले काही दिवस किमान तापमान २५ ते २६ अंश से. दरम्यान राहत असल्याने पहाटेही गारवा जाणवत नव्हता. मात्र सध्या दिवसा तापमान ३३- ३४ अंश से. तर रात्रीचे तापमान २० – २२ अंश से. दरम्यान असते. दिवसभरातील तापमानात दहा ते बारा अंश से.चा फरक पडतो. त्यामुळे दिवसा उष्मा जाणवतो. मात्र रात्री थंड असतात.
‘गेले पाच दिवस कमाल तापमानात घट होत आहे. किमान तापमान २५ अंश से. दरम्यान राहत होते. मात्र गेल्या दोन दिवसांत हे तापमानही कमी झाल्याने पहाटे गारवा जाणवत आहे. तापमानाचा हा ट्रेण्ड पुढील तीन दिवस तरी कायम राहणार आहे,’ असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर म्हणाले. सध्या वारे उत्तर तसेच ईशान्येकडून वाहत असल्याने हा बदल जाणवत आहे. मात्र उत्तरेत थंडीची लाट आलेली नाही. त्यामुळे मुंबईत एवढय़ात थंडी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या तापमान उतरणीला लागले असले तरी पुन्हा त्यात वाढ होण्याचीही शक्यता आहे.
ऑक्टोबर ‘हीट’विना
ऑक्टोबर महिना कोणत्याही हीटशिवाय गेला आहे. १९ ऑक्टोबर रोजी पाऊस माघारी फिरल्याचे वेधशाळेने जाहीर केले. त्याचदिवशी कुलाबा येथे ३६.३ अंश से. तर सांताक्रूझ येथे ३५.६ अंश से. कमाल तापमान नोंदवण्यात आले. पुढचे पाच दिवस तापमान ३५ अंश से. दरम्यान राहिले. मात्र ऑक्टोबर हीटचा तडाख्यातून मुंबई यावेळी बचावली. पाऊस लांबल्याने आणि त्यानंतर ऋतुबदलामुळे लागलीच तापमानात घट होण्याचा ट्रेण्ड सुरू झाल्याने ऑक्टोबर हीट जाणवली नाही.

Story img Loader