मुंबई : महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मुंबईतील अक्सा समुद्र किनाऱ्यावर बांधलेल्या ६०० मीटर लांबीच्या समुद्री भिंतीवरील पदपथाचा काही भाग भरतीच्या पाण्यामुळे खचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, समुद्रकिनाऱ्याच्या मधोमध बांधलेल्या या भिंतीमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा काही महिन्यांपूर्वी पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केला होता.

महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाने सागरी जीवांची उत्पत्ती वाढवण्यासाठी, तसेच जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने अक्सा समुद्रकिनाऱ्यावर समुद्री भिंत बांधली आहे. अक्सा किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या समुद्री भिंतीला पर्यावरणतज्ज्ञांनी यापूर्वीच विरोध केला होता. मढमधील अक्सा समुद्रकिनारा सीआरझेड अधिसूचना, २०११ अंतर्गत सीआरझेड १ क्षेत्राच्या श्रेणीत येतो.

हेही वाचा…मुंबई: भटके श्वान, मांजरींच्या तक्रारीसाठी महापालिकेचे मोबाइल ॲप

याचिकाकर्त्यांनी समुद्रकिनाऱ्याच्या मधोमध बांधलेली भिंत सीआरझेड नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा दावा केला होता. सीआरझेड झ्र १ क्षेत्रात बांधकामावर निर्बंध घालण्यात आल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी लवादाच्या निदर्शनास आणून दिली. पर्यावरणतज्ज्ञांनी केलेल्या एका तक्रारीवरून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालयाने राज्य पर्यावरण विभागाला या प्रकरणात लक्ष घालण्याचे व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही याबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आता समुद्री भिंतीवरील पदपथाचा काही भाग खचल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, ही भिंत पाडण्याची आणि भरती – ओहटीचा मार्ग मुक्त करण्याचे आवाहन पार्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

हेही वाचा…रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्प : रहिवाशांची पात्रतेची अंतिम यादी सोमवारपासून प्रसिद्ध करणार

भरतीच्या पाण्यामुळे या समुद्री भिंतीवरील पदपथाचा काही भाग खचू लागला आहे. तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठात सुनावणी सुरू असतानाही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण केले. – बी. एन. कुमार, पर्यावरणप्रेमी आणि याचिकाकर्ते.

Story img Loader