मुसळधार पावसाने आजही मुंबईकरांना झोडपून काढले आहे. पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. सकाळपासून येत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई-ठाणेकरांना सुटीचा दिवस असूनही घराबाहेर पडता न आल्याने आजचा दिवस पाण्यात गेला आहे. अनेक भागात पुन्हा पाणी साचले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता सध्या वाढत आहे. त्यामुळे आज कमी दाबाचे हे क्षेत्र अधिक ठळक होऊन मध्य भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मुंबईत मोठमोठ्या लाटांचा समुद्रकिनाऱ्याला तडाखा बसत आहे. मरिन ड्राईव्हवर लाटांचे हे रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. नवी मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, दादर, लालबाग, परळ, विक्रोळी, मुलूंड, दहिसर, घाटकोपर, कांजूरमार्ग आदी भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. नवी मुंबईतही पावसाचा जोर वाढला. ऐरोली, नेरूळ, बेलापूर, पनवेलमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. रात्रभर संततधार कोसळणाऱ्या पावसाने पहाटेपासूनच जोर धरला. मुंबईतील दादर हिंदमाता, किंग्ज सर्कल, माटुंगा, वडाळा, वरळी, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, शिवडी, कुर्ला, सायन, चुनाभट्टी, घाटकोपर, गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी आदी भागात पाणी साचले होते.

मागील २४ तासांमध्ये कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. आजही राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High tide in mumbai as heavy rain lashes the city
Show comments