विद्यार्थ्यांशी मोदींचा सुसंवाद घडविण्यासाठी महाविद्यालयांना विचित्र फर्मान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परीक्षेतील ताणतणावांशी सामना करता यावा, यासाठी विद्यार्थ्यांचा ‘सुसंवाद’ थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी घडवून आणण्याच्या नावाखाली राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालय प्राचार्याचा व प्राध्यापकांचा रक्तदाब मात्र वाढवायचे ठरविले आहे. १६ फेब्रुवारी म्हणजे आज होणाऱ्या या सुसंवाद कार्यक्रमाचे पत्र आदल्या दिवशी (१५ फेब्रुवारीला, तेही सायंकाळी सव्वापाचला) महाविद्यालयांना धाडून प्राचार्यानी दूरचित्रवाणी संच अथवा रेडिओ किंवा संगणकाची व्यवस्था करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. केवळ आदेश देऊन विभाग थांबलेला नाही, तर महाविद्यालयांनी त्याच दिवशी (शुक्रवारी) सायंकाळी ६ वाजेपर्यंत किती विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदविला, याची माहिती विभागाला द्यायची आहे. जी महाविद्यालये अशी माहिती सादर करणार नाहीत, त्यांची नोंद घेतली जाईल, असा गर्भित इशारा विभागाने प्राचार्याना दिल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. प्राचार्यासह महाविद्यालयातील अध्यापकांचाही ताण वाढविणारा असा विचित्र प्रकारचा हस्तक्षेप अगदी आणीबाणीच्या काळातही शिक्षण क्षेत्रात झालेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यामुळे शिक्षणवर्तुळात व्यक्त होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरिअर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते झाले. सध्या या पुस्तकाची शैक्षणिक क्षेत्रात चर्चा आहे. यापुढे जाऊन लेखकाचे म्हणजे खुद्द पंतप्रधानांचे या विषयावरील विचार विद्यार्थ्यांना थेट ऐकविण्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ठरविले आहे. त्यासाठी पंतप्रधानांच्या शुक्रवारी होणाऱ्या या ‘सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयांनी करावे आणि त्यासाठी दूरचित्रवाणी संच वा रेडिओ, संगणक, लॅपटॉप इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनाही हजर राहण्यास सांगावे, असा आदेश शिक्षण संचालकांनी सायंकाळी ५.१५ वाजता ईमेल पाठवून दिला. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रश्न विचारण्याची सोयही महाविद्यालयांनी उपलब्ध करून द्यायची आहे. त्याला पंतप्रधान आपल्या भाषणादरम्यान उत्तर देणार आहेत.

सकाळी ११ ते १२ या वेळेत हा सुसंवाद कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी आलेल्या ईमेलनंतर सकाळी ११ वाजेपर्यंत दूरचित्रवाणी संच, संगणक किंवा रेडिओची सोय कशी करायची, असा प्रश्न प्राचार्याना पडला. त्यातून एका महाविद्यालयात हजारो विद्यार्थी असतात. सकाळबरोबरच दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांची (एकाच वेळी) आणि त्यांच्या पालकांची भाषण ऐकण्याची सोय कशी करायची, यावर खल करण्यातच प्राचार्याची रात्र सरणार आहे. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी असला तरी आमचा रक्तदाब वाढविणारा आहे, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक व्यक्त करत आहेत.

पत्रातील आक्षेपार्ह वाक्ये

सर्व महाविद्यालयांनी उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करून प्रस्तुत कार्यक्रमात किती विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी सहभाग नोंदविला, याबाबतचा अहवाल १६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विनाविलंब या कार्यालयास (विभागीय सहसंचालक) सादर करावा. जे महाविद्यालय विहित मुदतीत अहवाल सादर करणार नाहीत, त्याची माहिती संचालनालयास कळविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

हा प्रकार जॉर्ज ऑर्वेलच्या १९८४ कादंबरीची आठवण करून देणारा आहे. याअगोदर इतका विचित्र हस्तक्षेप अगदी आणीबाणीच्या काळातही शिक्षण क्षेत्रात झाला नसेल.        – एक प्राचार्य

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Higher and technical education department narendra modi