लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यात सायबर गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद गेल्या वर्षात झाली असून ऑक्टोबर २०२४ पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार दोन लाख ४१ हजार तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी मुंबई, ठाणे, पुण्यातील आहेत. जानेवारी ते ॲाक्टोबर २०२४ पर्यंत ८११ कोटींची फसवणूक झाली आणि सायबर पोलिसांना फक्त २७ कोटी हस्तगत करता आले. २०१६ पासून आतापर्यंत ३२१६ कोटींची फसवणूक झाली आणि त्यापैकी फक्त ६१ कोटी रुपये हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मिळविलेल्या या तपशिलामुळे ही गंभीर बाब उघड झाली आहे. २०१६ मध्ये `महासायबर पोर्टलʼची स्थापना राज्य शासनाने केली. तेव्हापासून उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये २०८५ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. आता ऑक्टोबर २०२४ पर्यंत ६४५० प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. गेल्या आठ वर्षांत तिप्पट वाढ झाल्याचे दिसून येते.

मुंबई, ठाणे व पुणे ही राज्यातील सर्वाधिक प्रभावित शहरे सायबर गुन्ह्यांची केंद्रे ठरली आहेत. २०२४ मध्ये मुंबईत ५४ हजार ८३६ तर पुणे आणि ठाण्यात अनुक्रमे २६ हजार ३३२ आणि २३ हजार १४८ तक्रारी नोंदवल्या गेल्या. नवी मुंबई (१४ हजार १११), नागपूर (१३ हजार ४४२) आणि मीरा-भाईंदर-वसई-विरार (१३ हजार २२९) मध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे या माहितीवरून दिसून येते.

सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना गुन्हेगारांना अटक होण्याची संख्या निराशाजनक आहे. २०२४ मध्ये सायबर फसवणुकीच्या प्रकरणांपैकी दहा टक्के प्रकरणांची उकल करणेही सायबर पोलिसांना शक्य झालेले नाही. उकल झालेल्या ५९७ प्रकरणात ६६७ जणांना अटक झाली. उपलब्ध असलेल्या २०१६ पासूनच्या आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये दोन हजार ८५ प्रकरणात ९९९ कोटींची आतापर्यंतची सर्वाधिक फसवणूक नोंदली गेली. त्यापैकी ५० टक्के प्रकरणांची उकल होऊनही प्रत्यक्षात फक्त दोन कोटी रुपये हस्तगत झाले. २०१७ ते आतापर्यंत नोंदल्या गेलेल्या तक्रारींची उकल होण्याचे प्रमाण फक्त १५ ते २० टक्के असल्याचे दिसून येते. २०२० मध्ये ३८ हजार ६५२ तक्रार नोंदल्या गेल्या होत्या. त्यात वाढ होऊन २०२३ मध्ये एक लाख ६९ हजार ३४३ तर २०२४ मध्ये दोन लाख ४१ हजार ४०५ तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत, असे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

सायबर फसवणुकीबाबत नोंद करण्यासाठी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल उपलब्ध असून त्याचा संपर्क दूरध्वनी १९३० आहे तर राज्य पोलिसांचे ‘महासायबर’ हे पोर्टल २०१६ पासून अस्तित्वात आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) हे प्रमुख आहेत. याशिवाय विशेष महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षक असून १४४०७ हा संपर्क दूरध्वनी आहे. या दोन्ही पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करता येते.