‘महाराष्ट्राचा चिंतामणी’ विशेषांकाचे आज  डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : भारतीय रिझर्व्ह   बँकेचे पहिले गव्हर्नर, माजी केंद्रीय अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि कुशल प्रशासक ते संस्कृत पंडित, वनस्पतीशास्त्रज्ञ अशा अनेक आघाड्यांवर चिंतामणराव द्वारकानाथ ऊर्फ सी. डी. देशमुख आपल्या बुद्धिकौशल्याने आणि विशुद्ध परखडपणाने तळपले. या प्रकांडपंडित पुरुषोत्तमाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘लोकसत्ता’ने  ‘महाराष्ट्राचा चिंतामणी’ हा खास विशेषांक योजला. मान्यवर तज्ज्ञांचे दर्जेदार लेखन  असलेल्या या संग्राह्य विशेषांकाचे प्रकाशन आज, (२७ मे) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह   बँकेचे माजी कार्यकारी संचालक डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे.

‘महाराष्ट्राचा चिंतामणी’ विशेषांकात देशाच्या अर्थकारणास ऐतिहासिक वळण देणारे, त्याचप्रमाणे भारताच्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक व सामाजिक व्यवस्थेस चेहरामोहरा प्रदान करणाऱ्या चिंतामणराव देशमुखांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व साकारण्यात आले आहे.

कोकणात रायगड जिल्ह्यातील नाते या छोट्याशा गावात सी. डी. देशमुख यांचा जन्म झाला. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर इंग्लंडला जाऊन स्वातंत्र्यपूर्व काळात ‘आयसीएस’ परीक्षेत त्यांनी अव्वल क्रमांक पटकावला. पुढे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी दिल्या गेलेल्या लढ्यात चिंतामणरावांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देऊन हा लढा राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले; त्यामुळे पुढे मुंबईसह नव्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या पायाभरणीत सी. डी. देशमुख यांनी सिंहाचा वाटा उचलला. स्वातंत्र्यानंतर देशातील आर्थिक आणि प्रशासकीय, तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या विविध संस्थांच्या उभारणीचे श्रेयही चिंतामणरावांकडे जाते. अशा प्रकांडप्रज्ञेच्या आणि बहुमुखी प्रतिभेच्या चिंतामणरावांचे विविधांगी कार्य त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृती-वर्षाचे औचित्य साधून पुनश्च लोकांसमोर आणण्याकरिता ‘लोकसत्ता’ने या विशेषांकाची योजना केली आहे.

विशेषांकात काय?

सद्य:स्थितीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले अनेक अर्थतज्ज्ञ, इतिहास अभ्यासक, आचार्य अत्रे यांच्यासारखा व्यासंगी संपादक, खुद्द ‘सी.डी.’ यांची, शिक्षण ते अर्थविचार अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारी अप्रकाशित मुलाखत, देशमुख यांच्या सुविद्य पत्नी दुर्गाबाई यांचे हृद्य लेखन अशा अनेक वैशिष्ट्यांनी हा अंक नटला आहे.

प्रायोजक

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.

पॉवर्डबाय :  कॉर्डेलिया क्रुझेस

ऑनलाइन सहभागासाठी…

या विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होण्यासाठी  http://tiny.cc/ Maharash tracha_ Chintamani  येथे नोंदणी आवश्यक.  क्यूआर कोडद्वारेही सहभागी होता येईल.