‘चिन्हांकित’!
सुमारे ११ कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र आज भाजप सरकारच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष ठेवून असणार याची जाणीव भाषणाच्या सुरुवातीलाच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी बोलून दाखविली असली, तरी सारे आकडे आणि अनेक योजना केवळ ‘चिन्हांकित’ करण्याची नवी पद्धत अर्थसंकल्पीय भाषणात रूढ करून त्यांनी केवळ सभागृहच नव्हे, तर राज्यातील जनतेसमोरही प्रश्नचिन्हे उभी केली. आपल्या भाषणात मुनगंटीवार वारंवार ‘चिन्हांकित’ हा शब्द वापरत होते. सभागृहाला हा शब्द नवा असल्याने त्याच्या प्रत्येक उच्चारासोबत विरोधी सदस्यांप्रमाणेच सत्ताधारी बाकांवरील सदस्यांच्या चेहऱ्यांवरही प्रश्नचिन्हे उमटत होती. अखेर, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी या शंकेला वाचा फोडली. ‘हे चिन्हांकित प्रकरण नेमके आहे तरी काय’, असा थेट प्रश्न त्यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे विचारला. ‘केवळ आकडेच नव्हे, तर संपूर्ण भाषणच चिन्हांकित आहे का’, असा खोचक सवालही त्यांनी केला. तरीही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या शब्दाचे समर्थन केलेच. ‘भाषण चिन्हांकित असले तरी तुमच्यासारखे प्रश्नांकित नाही’, असे उत्तर देऊन सत्ताधारी बाकाच्या टाळ्याही त्यांनी मिळविल्या. पण नंतरही ‘चिन्हांकित’ या शब्दप्रयोगानंतर सारे चेहरे प्रश्नचिन्हांकित होतच राहिले.
‘डोकं ठेवायला जागा नाही’
आपल्या सुमारे सव्वादोन तासांच्या भाषणात मुनगंटीवार यांनी शेरोशायरीची अक्षरश उधळण केली. भाषणाच्या सुरुवातीलाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे अंगुलिनिर्देश करीत मुनगंटीवर म्हणाले, १९६० पासून प्रथमच, या सभागृहात साक्षात हरीच्या साक्षीने अर्थसंकल्प वाचण्याचे भाग्य मला लाभले आहे. समोरच्या बाकावरील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावावरही त्यांनी कोटी केली, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहात ते म्हणाले, ‘राज्याला प्रकाशाकडे नेण्यासाठी साक्षात देवेंद्र आमच्यासोबत आहे’.. त्यांच्या या ‘कोटीबाज’पणावर सत्ताधारी सदस्यांनी अपेक्षेप्रमाणे बाके बडवून भरपूर दादही दिली.. या महाराष्ट्रात ‘हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई भाई भाई, लेकिन बीच में अडचन लाती है काँग्रेस आई’.. असा टोला मारून त्यांनी अल्पसंख्याक, दलित, ओबीसींबाबतच्या योजना सांगण्यास सुरुवात केली, तेव्हा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांबरोबरच, काँग्रेसच्या सदस्यांनाही हसू आवरले नाही.. घरकुल योजनेचा तपशील सांगताना मुनगंटीवार यांना उत्स्फूर्त काव्यपंक्ती सुचल्या. ‘भारत माता आमची आई, डोकं ठेवायला जागा नाही’.. असे ते म्हणाले. तेव्हा मात्र क्षणभर सभागृहात शांतता पसरली..
योजनांवर भाजप नेत्यांची छाया
आजवर महाराष्ट्राला गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण, जोतिबा फुले, आदींच्या नावाने कल्याणकारी योजना लाभत असत. या वेळी प्रथमच, फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातून प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या योजनांवर दिवंगत जनसंघ-भाजप नेत्यांच्या नावाची मोहोर उमटली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी यवतमाळ जिल्ह्य़ात दिवंगत जनसंघ नेते मोतीरामजी लहाने यांच्या नावाने पथदर्शी योजना सुरू करण्यात येणार आहे, तर दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना घरांसाठी अर्थसाह्य़ देण्यासाठी ‘पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल खरेदी अर्थसाह्य़ योजना’ अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे. सामाजिक वनीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात ‘उत्तमराव पाटील वनउद्यान’ उभे करण्यात येणार आहे, तर शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने ‘एकात्मिक जन-वनविकास योजना’ राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारचा कौशल्य विकास कार्यक्रम राज्यात राबविण्यासाठी ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना’ अस्तित्वात येणार आहे.
‘आमची आठवण ठेवा’..
मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेकदा सहकारी मंत्री, विरोधी बाकांवरील नेते, काही आमदारांचा नामोल्लेख होत होता. महिलांच्या वापरातील पर्स आणि बॅगांवरील विक्री कर कमी करण्याचे जाहीर करताना त्यांनी पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधले, तर सिंचन प्रकल्पांसाठी सात हजार २७२ कोटींचा नियतव्यय प्रस्तावित करताना, मागे बसलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना साद घातली. वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी ५३५ कोटींचा नियतव्यय प्रस्तावित करताना मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर माफक स्तुतिसुमने उधळली, तर नाशिकच्या कुंभमेळ्यासंबंधी माहिती देताना छगन भुजबळ यांचे लक्ष वेधले. तीर्थक्षेत्र विकासाच्या अनेक योजना जाहीर करताना तर, सभागृहात सर्वत्र नजर फिरवत मुंनगंटीवार यांनी त्या त्या मतदारसंघातील आमदारांची नावे घेत त्यांचे लक्ष वेधले. सर्व शिक्षा अभियान आणि शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी १६९०.५३ कोटींचा नियतव्यय प्रस्तावित करताना, विनोद तावडे खूप काम करतात, असा शेरा त्यांनी मारला. पुण्यातील प्रस्तावित योजनांची माहिती देताना, अजित पवार आणि गिरीश बापट यांचा उल्लेख करून, ‘आमची आठवण ठेवा’, असे मुनगंटीवार म्हणाले, तेव्हा पुन्हा हशा पिकला..