मुंबई: एका उच्च शिक्षित महिलेला ऑनलाईन काम देण्याचे आमिष दाखवून काही भामट्यांनी तब्बल नऊ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी महिलेने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मुलुंड कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेली ४३ वर्षीय महिला एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर कामाला आहे. फावल्या वेळेत कामासाठी तिने काही समाजमाध्यमांवर अर्ज केले होते. काही दिवसांपूर्वी एका भामट्याने त्यांना फोन केला. घरबसल्या काम केल्यास प्रतिदिन दीड हजार रुपये देण्यात येतील, असे आमिष त्याने महिलेला दाखवले. त्यानुसार महिलेने काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तीन – चार दिवस आरोपींनी महिलेच्या खात्यात पैसे जमा केले. मात्र त्यानंतर विविध कारण सांगून त्याने महिलेकडूनच पैसे घेण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>>मुंबई: चटईक्षेत्रफळ उल्लंघनप्रकरणी नगरविकास विभागाच्या स्पष्टीकरणाची झोपु प्राधिकरणाला प्रतीक्षा

अनेकदा पैशांचे अमिष दाखवून त्याने तिच्याकडून मोठी रक्कम काढून घेतली. सदर महिलेने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात एकूण ९ लाख ४० हजार रुपये भरले. मात्र भामट्यानी तिला पैसे परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.