एक हजार कोटी रुपयांचा संचित तोटा, घसरते प्रवासी भारमान आणि बहुतांश जुनाट गाडय़ा यामुळे आधीच गाळात चाललेल्या एसटी महामंडळाला या उन्हाळ्याच्या हंगामात मोठा तडाखा बसला आहे. केंद्र सरकारने डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर १.०९ पैशांनी वाढ केल्यामुळे एसटीच्या खर्चात प्रचंड वाढ होणार आहे. ही वाढ महिन्याला साडेचार कोटी रुपये एवढी असेल.
गेल्या काही दिवसांमध्ये एसटीच्या प्रवासी भारमानात आणि पर्यायाने उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. त्यातच एसटीचा संचित तोटा हजार कोटींच्या वर गेला आहे. राज्य सरकार एसटीचे १६०० कोटींचे देणे लागत असून ती रक्कम अजूनही एसटीला मिळालेली नाही. त्यातच एसटीला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नसल्याने एसटी महामंडळाची अवस्था सेनापती नसलेल्या सेनेसारखी झाली आहे. या अंदाधुंद कारभारातच एसटीला आता डिझेल दरवाढीने मोठा झटका दिला आहे.
एसटीच्या १७ हजार गाडय़ा दिवसाला तब्बल साडेतेरा ते चौदा लाख लिटर डिझेल पितात. यासाठी जुन्या डिझेल दरांप्रमाणे ८ कोटी ९६ लाख रुपये लागत होते. मात्र आता १.०९ रुपये दरवाढ झाल्याने डिझेल ६५ रुपयांच्या वर गेले आहे. त्यामुळे दिवसाला ९ कोटी दहा लाख रुपये खर्च येणार आहे. जुन्या दरांप्रमाणे महिन्याकाठी एसटीचा इंधनखर्च २६८ कोटी रुपये होता. आता त्यात तब्बल चार कोटींची वाढ होऊन तो २७२ कोटी रुपये एवढा होणार आहे.
ही वाढ पाच कोटी रुपये एवढी क्षुल्लक वाटत असली, तरी प्रवासी उत्पन्न घटल्यामुळे एसटीला होणारे नुकसान वाढले आहे. त्यामुळे यापुढे राज्य परिवहन महामंडळाची सेवा चालणे कठीण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा