मुंबई : काही दिवसांपूर्वी उरण जवळील एका गावात अशक्त अवस्थेत सापडलेल्या हिमालयीन गिधाडाचा बचाव करण्यात आला होता. बचाव केल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय उपचारानंतर गिधाडाची प्रकृती पूर्णपणे सुधारली असून त्याला गुरुवारी पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरणजवळील चिरनेर गावात जानेवारी महिन्यात एक अशक्त गिधाड सापडले होते. वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या या गिधाडाला वैद्यकीय उपचरांसाठी रॉ या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. प्रथमदर्शनी गिधाड निर्जलीकरणामुळे अशक्त झाल्याचे निदर्शनास आले. तपासणीअंती ते कुपोषित असल्याचेही लक्षात आले. रॉ संस्थेचे पशुवैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करीत होते. वैद्यकीय उपचारादरम्यान गिधाडाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. दरम्यानच्या काळात त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाशी काही दिवसांपासून संस्थेचे पदाधिकारी चर्चा करीत होते.

गिधाड ज्या गावात सापडले तेथे काही दिवसांपूर्वी बर्डफ्लूची साथ असल्याचे घोषित करण्यात आले होते. या परिसरात कुक्कुटपालकांच्या कोंबड्या बाधित हाऊन मृत झाल्या होत्या. तेथील बर्डफ्लू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी कोंबड्या मारण्याचे आदेश दिले होते. हे गिधाड बर्डफ्लू बाधित क्षेत्रातील एक किलोमीटरच्या परिसरात आढळले होते. या पार्श्वभूमीवर हिमालयीन गिधाडाची एव्हीयन इन्फ्लूएंझाची चाचणी करण्यात आली. यामुळे हिमालयीन गिधाड नेमके कशामुळे अशक्त आणि कुपोषित झाले हे कळण्यास मदत झाली. दरम्यान, वैद्यकीय चाचणीच्या अहवालानुसार निर्जलीकरणामुळे गिधाड अशक्त झाल्याचे समोर आले. त्याला बर्डफ्लूची लागण झाली नसल्याचेही स्पष्ट झाले. अखेर प्रकृती सुधारल्यानंतर त्याने पुन्हा उंच भरारी घेतली.

निसर्गाची अन्न साखळी आणि स्वच्छता राखणारा घटक म्हणून गिधाड अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, हा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) गिधाडांच्या संवर्धनासाठी पावले उचलली आहेत. हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि आसाम या चार राज्यांमध्ये बीएनएचएसची गिधाड प्रजनन केंद्रे आहेत. सोसायटीने २००४ पासून गिधाडांच्या कृत्रिम प्रजननाचे काम सुरू केले आहे. हिमालयीन गिधाड अफगाणिस्तान, कझाकस्तान, किर्गीस्तान, उझबेकीस्तान, ताजिकिस्तान, तिबेट, नेपाळ, चीनचा पश्चिम भाग, मंगोलिया या भागात आढळते. तसेच इशान्य भारतातही ते आढळते. थंडीच्या हंगामात हे पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. देशभरात गिधाडांची संख्या कमी होऊ लागताच महाराष्ट्रात गिधाडे दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’तील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला आहे.

हिमालयीन‌ गिधाडे दरवर्षी हिवाळी हंगामात राज्यात दिसतात. राज्यात पांढऱ्या पुठ्याच्या, लांब चोचीच्या आणि पांढऱ्या गिधाडांचा कायमस्वरुपी अधिवास आहे. मात्र, हिमालयीन गिधाड हे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये राज्यात आढळते. खास करून कोकणात ही गिधाडे मोठ्या संख्येने दृष्टीस पडतात. गेल्या काही वर्षांमध्ये डिसेंबर-जानेवारी महिन्यांदरम्यान कोकणात दहा ते बारा हिमालयीन गिधाडांची नोंद करण्यात आली आहे.