जर्मन बेकरी खटल्यातील दोषी हिमायत बेग याला साक्षीदारांनी खोटी साक्ष देऊन अडकविल्याचा खळबळजनक आरोप एका वृत्तसंकेत स्थळाचे पत्रकार आशिष खेतान यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केला. आपल्या आरोपाच्या पुष्टथ्र्य त्यांनी या खटल्यातील पाच साक्षीदारांच्या वार्ताकनाची स्टिंग ऑपरेशनद्वारे तयार केलेली चित्रफीतही सादर केली. मात्र राज्य पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने हे सर्व आरोप साफ खोटे असल्याचे सप्रमाण दाखवून दिले.
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिदिनचा दहशतवादी हिमायत बेग याला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील पाच साक्षीदारांवर दहशतवादविरोधी पथकाने दबाव टाकून खोटी साक्ष देण्यास भाग पाडले, असा आरोप खेतान यांनी शुक्रवारी केला.
इंदोरी रेहमान शेख, मोहम्मद अन्सारी, अतिक नजीर आणि गौस शेख अशी या साक्षीदारांची नावे आहेत. या साक्षीदारांना खोटी साक्ष देण्यासाठी धमकाविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कुणाच्या नातेवाईकाचे अपहरण करण्यात येईल तर कुणाला दहशतवादी ठरविण्यात येईल, अशा प्रकारे धमकाविल्याचा आरोप खेतान यांनी केला.
दहशतवादविरोधी पथकाने मात्र हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. या पाच साक्षीदारांपैकी एका साक्षीदाराने न्यायालयात साक्षच दिलेली नव्हती. तर दोन साक्षीदारांनी वेगवेगळ्या न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे कलम १६४ अन्वये साक्ष दिलेली होती. उरलेल्या साक्षीदाराने साक्ष फिरवली होती. तर पाचव्या आरोपीने आरडीएक्स सापडले, असे सांगण्यास भाग पाडल्याचा आरोप खेतान यांनी केला. पण आरडीएक्स सापडले, असा दावा मुळात एटीएसने केलाच नव्हता. त्यामुळे हे सर्व आरोप कसे खोटे आणि बिनबुडाचे आहेत ते स्पष्ट होत असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन वर्ष खटला सुरू असताना खुद्द हिमायत बेगनेही असे आरोप केले नव्हते, मग आताच का जाग आली, असा सवाल एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केला.

Story img Loader