चार महिने झाले तरी नववीच्या ‘हिंदी’च्या ‘लोकभारती’ या पाठय़पुस्तकामधील चुकांची दुरुस्ती करण्यात न आल्याने शिक्षकांना या सदोष पुस्तकाच्या मदतीनेच शिकवावे लागत आहे.
‘राज्य शिक्षण मंडळा’ने लोकभारतीची दुसरी आवृत्ती जूनमध्ये बाजारात आणली. त्यात अशुद्धलेखनाबरोबरच चुकीचे शब्दप्रयोग आणि वाक्यप्रयोगांच्या तब्बल १०० हून अधिक चुका असल्याचे काही शिक्षकांनी पाठय़पुस्तक मंडळाच्या लक्षात आणून दिले. या पुस्तकात अनेक ठिकाणी व्याकरणाच्या नियमांनाही हरताळ फासण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही याच पुस्तकात चुका करण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही चुकांची या पाठय़पुस्तकात पुनरावृत्ती करण्याबरोबरच त्यात अधिकची भरही घातली आहे. स्वह (रूह), शिष्ठता (शिष्टता), खट्ठा (खट्टा), भुला (भूला), प्राणिमात्र (प्राणीमात्र), पचीसों (पच्चीसों), विरोगी (विरागी), बेलाग (बेदाग), परिषोष (परिपोष), प्रदिशा (प्रदशिक्षा) असे चुकीचे शब्द पुस्तक जागोजागी आहेत. राज्यभरात दरवर्षी तब्बल १२ लाख विद्यार्थी ‘लोकभारती’चे पुस्तक अभ्यासतात.
हिंदीच्या काही शिक्षकांनी या चुका लक्षात आणून दिल्यानंतर त्यांची दुरुस्ती करणारे परिपत्रक मंडळाने काढणे अपेक्षित होते. परंतु, या चुकांची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. अनेकदा मंडळातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘शिक्षण संक्रमण’ या अंकाच्या माध्यमातून पाठय़पुस्तकांमधील दुरुस्त्या जाहीर केल्या जातात. या मासिकाचा या शैक्षणिक वर्षांतील पहिला अंक ऑगस्टमध्ये मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केला. परंतु, यातही लोकभारतीतील चुकांविषयी खुलासा केलेला नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांना वर्षभर हे दोषयुक्त पुस्तक अभ्यासावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया ‘मुंबई प्रांतीय राष्ट्रभाषा प्रचार सभे’चे सदस्य आणि हिंदीचे एक शिक्षक राजेश कुमार पंडय़ा यांनी दिली.
पंडय़ा यांनीच या पुस्तकातील चुका अधोरेखित केल्या होत्या. ‘लोकसत्ता’मध्ये या संबंधात वृत्त आल्यानंतर मंडळाच्या हिंदी विषयाच्या लेखक मंडळातील सदस्यांनी पंडय़ा यांच्याशी संपर्क साधून चर्चाही केली. त्यानंतर या चुकांची दुरुस्ती परिपत्रकाद्वारे किंवा शिक्षण संक्रमणमध्ये जाहीर केली जाईल, असे आश्वासनही दिले होते. मात्र, चार महिने झाले तरी मंडळाने या दुरुस्त्या करण्याची तसदी घेतलेली नाही, असेही पंडय़ा म्हणाल़े
चुकांमधून ‘मंडळ’ही सुटले नाही
‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने आपल्या नावातले ‘मंडळ’ही ‘मंडल’ म्हणून छापले आहे. अनुक्रमणिकेत दिलेला एक धडा तर पुस्तकात नाहीच. तर पुस्तकात असलेल्या एका धडय़ाचे नावच अनुक्रमणिकेत नाही. पुस्तकातील दोन्ही शब्दकोडी चुकली आहेत. या शिवाय ‘सोदाहरण’च्या ऐवजी ‘सोदहरण’, ‘पृथ्वी’ऐवजी ‘पृध्वी’, ‘वाशी’ऐवजी ‘वासी’, ‘मध्यमवर्ग’ऐवजी ‘मध्यवर्ग’ असे चुकीचे शब्द पुस्तकात जागोजागी आढळतात.

Story img Loader