एरव्ही पंजाबी संस्कृतीच्या प्रेमात असणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीला आता मराठी संस्कृतीही आपलीशी करण्याची गरज वाटू लागली आहे. म्हणून मग हिंदी चित्रपटातून मराठी ठसका असलेली गाणी, मराठी नायक किंवा नायिका असे बदल होऊ लागले आहेत. विशेषत: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींमध्ये मराठी मुलगी जास्त लोकप्रिय होत चालली आहे. याआधी प्रियांका चोप्रा ‘कमिने’ चित्रपटात, दीपिका पदुकोण ‘लफंगे परिंदे’ या चित्रपटात, राणी मुखर्जी ‘अय्या’ चित्रपटात मराठी मुलगी झाली होती. आता या यादीत नविन नाव दाखल झाले आहे ते दाक्षिणात्य अभिनेत्री असिन थोटुकमलचे. अक्षय कुमारच्या ‘खिलाडी ७८६’ या चित्रपटात अस्सल मराठी मुलगी साकारण्यासाठी असिनने थेट दादरचे हिंदमाता गाठले.
दादर परिसर हा मराठीजनांचा म्हणून खास ओळखला जातो. आपल्याला चित्रपटात मराठी मुलगी साकारायची असेल तर तिचे कपडे, तिचे वागणे-बोलणे हेही महाराष्ट्रीय लोकांप्रमाणेच असायला हवे, याची पक्की खूणगाठ बांधलेल्या असिनने या भूमिकेसाठीआपण स्वत:च कपडे खरेदी करणार हे जाहीर केले होते. दादरचे हिंदमाता मार्केट हे मराठी तरूणींचे कपडय़ांसाठीचे आवडते मार्केट आहे, याची माहिती मिळाल्यानंतर असिनने थेट हिंदमाता मार्केट गाठले. मराठी तरूणी कशाप्रकारच्या साडय़ा, ड्रेस घालणे पसंत करतात हे तिने इथल्या दुकानदारांकडून जाणून घेतले. एवढेच नव्हे तर साडी खरेदी केल्यानंतर तिने महाराष्ट्रीय पध्दतीने साडी कशी नेसायची?, साडी नेसून वावरतानाची त्यांची काही विशिष्ट देहबोली असते का याची माहिती घेणेही सुरू केले आहे.
विशेषत: मराठी लोकांचे उच्चार कसे असतात, याबद्दल हिंदमाता मार्केटमधील दुकानदारांकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्नही असिनने केला. ‘अय्या’ चित्रपटात राणी मुखर्जीला मराठी मुलगी साकारताना फारशी अडचण आली नाही. कारण तिच्या म्हणण्यानुसार ती लहानाची मोठी झाली तीच मुळी मराठी माणसांच्या मुंबईत. तर दीपिका पदुकोणचाही मराठीशी थोडका का होईना संबंध असल्याने तिलाही फार अडचण आली नाही.
असिन दक्षिणेतून मुंबईत चित्रपटात कारकिर्द करण्यासाठी आली असल्याने तिला अस्सल मराठी मुलगी साकारण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आहे.  थेट मराठमोळ्या परिसरात शिरून मराठी आचारविचार शिकून घेण्याचा तिचा हा प्रयत्न तिला इतर अभिनेत्रींपेक्षा नक्कीच वेगळा करून गेला आहे.     

Story img Loader