अल्पसंख्याकांची नाराजी टाळण्यासाठी काँग्रेसने घेतली खबरदारी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हिंदू दहशतवाद्यांच्या छावण्या चालवितात हे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या जयपूर चिंतन शिबिरात केलेले वक्तव्य हे अल्पसंख्याक समाजात विश्वासाचे वातावरण तयार करण्याच्या योजनेचाच भाग होता. अफझल गुरूला फाशी दिल्यावर त्याची अल्पसंख्याक समाजात प्रतिक्रिया उमटू नये या उद्देशाने हिंदू दहशतवादाचा मुद्दा मुद्दामच काँग्रेसने पुढे आणला होता हे आता पुन्हा स्पष्ट झाले आहे.  
सौम्य स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिंदे यांनी काँग्रेसच्या शिबिरात हिंदू दहशतवादाचा उल्लेख केल्याने त्याची राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. भाजप आणि संघ परिवाराने शिंदे यांनाच लक्ष्य करीत अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्याच्या योजनेचा भाग असल्याचा आरोप केला होता. शिंदे यांनी हिंदूना दहशतवादी संबोधल्याने भाजपने तर त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसने मात्र पद्धतशीररीत्या हिंदू दहशतवादाचा मुद्दा पुढे आणून अल्पसंख्याकांमध्ये योग्य कसा संदेश जाईल, या दृष्टीने नियोजन केले. ‘लोकसत्ता’ने २३ जानेवारीच्या अंकात शिंदे यांच्या त्या वक्तव्याचा अफझल गुरूच्या फाशीशी कसा संबंध आहे याचे सविस्तर विश्लेषण करणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. कसाबला फाशी दिल्यावर त्याची फारशी प्रतिक्रिया उमटणार नाही हे स्पष्टच होते. पण अफझल गुरूचा विषय संवेदनशील आणि नाजूक होता. हा मुद्दा तापविला जाईल याचा गृह खात्याला अंदाज आला होता. यामुळेच हिंदू दहशतवादाचा मुद्दा पुढे करून केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी अल्पसंख्याकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार केले. शिंदे यांच्या वक्तव्यानंतर भाजपने पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा पेटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सरकारच्या विरोधात वातावरण तापविण्यासाठी किंवा अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण कसे केले जाते हे दाखविण्यासाठी अफझल गुरूची फाशी हा मुद्दा भाजप किंवा संघ परिवाराकडे होता. हा विषय नाजूक असल्याने त्यावर लवकर निर्णय घेतला जावा, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह होता. अफझल गुरूला लवकर फाशी द्यावी म्हणजे भाजपला हा मुद्दा तापविता येणार नाही, अशीच काँग्रेसमध्ये भावना झाली होती. त्यातूनच अफझल गुरूच्या फाशीचा निर्णय घेण्यात आला. या फाशीनंतर अल्पसंख्याकांना भडकविण्याचे प्रयत्न होणार हे लक्षात घेता आधीच हिंदु दहशतवादाचा मुद्दा पुढे करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा