दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करुन ऑनलाइन पद्दतीने घ्याव्यात यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. धारावीसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून काही ठिकाणी तोडफोडदेखील करण्यात आली. दरम्यान सोशल मीडिया स्टार ‘हिंदुस्थानी भाऊ’ म्हणजेच विकास पाठकने आवाहन केल्यानंतर आपण रस्त्यावर उतरलो असल्याचं धारावीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. हिंदुस्थानी भाऊचाही सरकारला इशारा देतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांना त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी आक्रमक ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. रविवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ व्हायरल –

हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर ऑनलाइन परीक्षा घेण्याचा मागणीला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शेअर केली होती. तसंच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या भेटीसाठी पोहोचला होता. यावेळी धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केली आणि वर्षा गायकवाड यांच्या घऱासमोर आंदोलन केलं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी तो गाडीत बसला असून बाहेर आंदोलन करणारे विद्यार्थी दिसत आहेत. यावेळी तो सांगत आहे की, “ही या विद्यार्थ्यांची ताकद आहे. वर्षा गायकवाड यांना लवकरात लवकर परीक्षा रद्द करावी, मुलांची शिक्षा माफ करावी यासाठी निवेदन दिलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी निवदेन वर्षा गायकवाड यांच्याकडे देऊ असं आश्वासन दिलं आहे. जर इतकं केल्यानंतरही सरकारने ऐकलं नाही तर याच ताकदीने पुन्हा उतरु. हे विद्यार्थी आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. यांना न्याय मिळाला पाहिजे”.

दरम्यान पोलिसांनी माहिती घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

Story img Loader