मुंबई : सार्वजनिक ठिकाणी लहान बाळांना स्तनपान करणे फारच अवघड असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष उभारण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्तनपान कक्ष (हिरकणी कक्ष) सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यभरामध्ये ७० हिरकणी कक्ष बांधण्यात येणार असून, ते सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) साकारण्यात येणार आहेत.
अनेक महिला आपल्या तान्ह्या मुलांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन येतात. त्यावेळी रुग्णालयात असलेल्या गर्दीमुळे मातांना बालकांना स्तनपान देणे शक्य होत नाही. त्यामुळे तान्हे बाळ बराचवेळ उपाशी राहते. महिला व बाळांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हिरकणी कक्ष उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दोन हिरकणी कक्ष साकारण्यात येणार आहेत. प्रत्येक कक्षासाठी साधारणपणे तीन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या या ७० हिरकणी कक्षांसाठी साधारणपणे दोन कोटी ५० लाख रुपये इतका खर्च होणार आहे. हे सर्व हिरकणी कक्ष बांधण्यासाठी मेसर्स बुलसेये मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे. सीएसआर निधीअंतर्गत स्तनपान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या हिरकणी कक्षाचा कोणताही आर्थिक भार रुग्णालय प्रशासनावर पडणार नाही.
हेही वाचा – अखेर ला – निना सक्रीय, पण कमकुवत; जाणून घ्या, भारतावरील परिणाम
हे हिरकणी कक्ष बांधण्यासाठी संबंधित कंपनीला जागा, वीज पुरवठा व आवश्यक सुविधा वैद्यकीय महाविद्यालयाने उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत.हे हिरकणी कक्ष स्थापन करण्यासाठी वैद्यकीय विभागाकडून जी.टी. रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक विजय गायकवाड यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या हिरकणी कक्षासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये हिरकणी कक्ष उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.