कुलाब्यात एक ‘अरब गल्ली’ म्हणून ओळखला जाणारा एक रस्ता आहे.. या रस्त्याला ‘आर्थर बंदर रोड’ हे अधिक रूढ नाव आहे, पण त्याला ‘मारुतीच्या देवळाच्या कोपऱ्यावरला रस्ता’, ‘रेडिओ क्लबकडे जाणारा रस्ता’, ‘कोयला हॉटेलचा रस्ता’ अशी बरीच नावं लोकांनी ठेवली आहेत. ‘हाजी नियाझ अहमद आझमी मार्ग’ अशा अधिकृत नावाचा हा रस्ता म्हणजे हल्लीच्या काही वर्षांत समाजवादी पक्षाचे अबू असीम आझमी यांचं साम्राज्य, असं मानण्यात येतं! तर, कुलाबा कॉजवेवरनं (शहीद भगतसिंग मार्ग) पेट्रोल पंपाच्या समोर थांबून देवळाकडेनं या रस्त्यावर वळल्यानंतर, रेडिओ क्लबकडे जाताना डाव्या बाजूला ‘चोर बझार’, ‘अरेबियन नाइट्स’ अशा दुकानांच्या पाटय़ा पाहात-पाहात आपण ‘ग्रँट बिल्डिंग’पाशी पोहोचतो. या इमारतीच्या प्रशस्त, पण जरा अंधाऱ्याच लाकडी जिन्यानं दुसऱ्या मजल्यावर गेलात तर ‘साक्षी गॅलरी’ आणि ‘लकीरें’ अशा दोन गॅलऱ्यांची दारं अगदी समोरासमोर आहेत. दोन्ही दारं आपण बेल वाजवल्याशिवाय सहसा उघडत नाहीत. या दोन्ही गॅलऱ्यांपैकी ‘साक्षी’ आधी वरळी नाक्याला होती आणि ‘लकीरें’तर पाल्र्याला! पण मजल-दरमजल करीत गेली पाच र्वष ‘लकीरें’, तर गेली तीन र्वष ‘साक्षी’ इथंच आहेत.

दोन्ही गॅलऱ्या महत्त्वाच्या, म्हणून त्यांचा हा इतिहास-भूगोल सांगितला. त्या महत्त्वाच्या का आहेत, हे सांगणाऱ्या कलाकृती इथं आत्ता पाहायला मिळतील.. दोन्ही गॅलऱ्यांनी, त्यांच्या खास-खास दृश्यकलावंतांच्या कलाकृती सध्या प्रदर्शित केल्या आहेत. ‘साक्षी’चं दार उघडताच एक झगमगीत पडद्यासारखं शिल्प दिसेल. एल अनात्सुई या घाना देशातल्या ज्येष्ठ (वय ७२) शिल्पकारानं ‘दारू आणि कोक-पेप्सीसारखी पेयं यांची बुचं-झाकणं’ अशा तद्दन पाश्चात्त्य संस्कृतीतल्या वस्तूचा वापर घानाच्या परंपरेची आठवण करून देण्यासाठी केला आहे. ही झाकणं पूर्णत: सपाट करायची, धातूच्याच तारेनं ती एकत्र ‘विणायची’ आणि त्यातून आफ्रिकन रंगसंगतीशी आणि आफ्रिकन जमातींच्या शालींशी मिळतेजुळते पडदे – तेही शिल्पांसारखे किंवा विमानातून खाली दिसणाऱ्या जमिनीसारखे उठाव (उंची) असणारे तयार करायचे, अशी अनात्सुई

यांची पद्धत. इथं प्रदर्शित झालेल्या शिल्पात अनात्सुई यांनी मोठय़ा नकाशावरली सरोवरं दिसावीत त्याप्रमाणे काही जागा मोकळय़ा सोडल्या आहेत. मात्र प्रथमदर्शनी ‘सरोवरं’ वगैरे वाटणाऱ्या या

मोकळय़ा जागांचे काठ पूर्णत: करपलेले आहेत. ते आशेचं नसून, निराशेचं चिन्ह आहे. अनेकानेक प्रतिष्ठित कलासंग्रहालयांत पोहोचलेल्या अनात्सुईंची कलाकृती भारतात ‘साक्षी’मुळेच प्रत्यक्ष पाहायला मिळते.

‘साक्षी’मध्येच समंता बत्रा-मेहरा, झरीना हाश्मी आणि धृव मिस्त्री यांच्या कलाकृती पाहायला मिळतील. यापैकी झरीना हाश्मी यांचा कलाविचार हा अनात्सुई यांच्याप्रमाणेच ‘काहीही न दाखवता बरंच सांगू पाहाणारा’ असा आहे. ते काय सांगितलं जात आहे, हे ठरवण्यासाठी या कलावंतांना प्रेक्षकांचाही सहभाग महत्त्वाचा वाटतो. धृव मिस्त्री मात्र तुम्हाला थेट प्रतिमा दाखवतात! पण तीही नीट पाहावी लागेलच.. एकमेकांशी काटकोनात मिळालेल्या या दोन मानवाकृती आहेत. धातूच्या चौरस तुकडय़ातून मानवाकार कापून काढला असल्याचं पाहिल्यावर, दुसरा मानवाकार हा ‘त्याच कापलेल्या आकारातून उरलेला’ असं क्षणभर वाटेल; पण नीट पाहाच.. मग कळेल, चौरसावरचा आकार पुरुषाचा असेल, तर आतला स्त्रीचा आहे (किंवा उलट)! धृव मिस्त्री यांची या प्रकारातली शिल्पं म्हणजे, ‘पुरुषप्रकृती’ किंवा ‘यिन-यांग’ या भेद-ऐक्याचं त्यांनी साकारलेलं रूप आहे.

समोरच्या ‘लकीरें’त सध्या ‘फेस ऑफ’ या नावाचं प्रदर्शन सुरू आहे. प्राजक्ता पोतनीस, जस्टिन पोन्मणी, चित्रा गणेश आणि एन. पुष्पमाला यांच्या नव्या-जुन्या कलाकृतींचा समावेश त्यात आहे. जस्टिन यांनी २००७ मध्ये केलेलं एक ड्रॉइंगसारखं काम गाजलं होतं.. आधी निव्वळ दृश्यातच विचार करायचा, मग त्यातून शाब्दिक अर्थ शोधू पाहायचा, असा खेळ या कामात होता आणि त्या खेळात कधीकधी शब्द कसे कमी पडतात, कसे हास्यास्पदही ठरतात हे जस्टिन सांगू पाहात होता. हे काम आता या प्रदर्शनात पाहायला मिळेल. ज्यांना एन. पुष्पमाला यांचं काम ‘चिन्ह कला-अंकाच्या कव्हरावरली लक्ष्मी’ एवढय़ापर्यंतच माहिती आहे, त्यांनी या प्रदर्शनाला भेट दिल्यास गेल्या तीन वर्षांत नव्यानं पुष्पमाला काय करत होत्या, हे इथं पाहाता येईल. प्राजक्ता पोतनीस या गेल्या वर्षी बरेच महिने बर्लिनला अभ्यासवृत्तीसाठी होत्या. तिथं त्यांनी केलेली काही कामं पाहाताना ‘बर्लिन भिंती’बद्दल ही गुणी चित्रकर्ती विचार करत होती का, असा प्रश्न प्रेक्षकाला पडेल; पण प्राजक्ता यांचं काम तेवढय़ापुरतं नाही. मांद्य, सूज, फसफसणं.. हे सारं आपल्या आजच्या जीवनाशी कसं अभेद्यपणे निगडित होत चाललं आहे याचा प्रत्यय देणारी शिल्पंही त्यांनी केली आहेत, त्यापैकी दोन इथं आहेत.

ही दोन्ही प्रदर्शनं पाहण्याजोगी आहेतच, पण उणीदुणी काढायची तर प्रश्न पडेल- या कलाकृती नव्या कुठे आहेत? गॅलरीच्या संग्रहातल्याच तर आहेत ना.. होय! आहेत. आणि नव्या कलाकृतींची ताजी प्रदर्शनं कडकडीत उन्हाळय़ाच्या दिवसांत मुंबईतही कोणी सहसा भरवत नाही, हेही खरं आहे. म्हणजे पुढे असंही घालूनपाडून बोलता येईल की, ‘ठेवणीतली चित्रं वाळवणाला घालावीत तसलीच ही प्रदर्शनं. हो. हेही खरं.. पण वाळवणातले सांडगे किंवा कुरडया यांची चव पुढे उपयोगी पडणार असते कीनाही? तसंच या प्रदर्शनांमधून हल्लीच्या (समकालीन) चित्रकारांची माहिती करून घेतल्यास, पुढे आपल्यालाच प्रेक्षक म्हणून आजकालच्या नव्या कलाकृती पाहाताना उपयोग होईल, हे नक्की!

३० मेपर्यंत ही दोन्ही प्रदर्शनं नक्की खुली आहेत; पण रविवारी दोन्ही गॅलऱ्या बंद असतात.

Story img Loader