खोदकामात आढळणाऱ्या ऐतिहासिक अवशेषांचे जतन व संशोधन
सात बेटांचा समूह असलेल्या मुंबई शहराला ब्रिटिशांनी एकसंध केले असले तरी, या शहराचा इतिहास त्याहून कितीतरी जुना आहे. काही दिवसांपूर्वी गोरेगावच्या आरे कॉलनीत आढळलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांच्या खुणा सापडल्यानंतर आता ‘मेट्रो ३’च्या निमित्ताने मुंबईचा हा दडलेला इतिहास उजेडात येण्याची शक्यता आहे. कुलाबा ते सिप्झ या मेट्रो-३ प्रकल्पादरम्यान खोदकाम करताना काही ऐतिहासिक अवशेष आढळल्यास त्याचे परीक्षण व पाहणी करण्याची मुभा मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागाला देण्यात आली असून आढळलेल्या अवशेषांचे जतन करण्यासाठी ‘मुंबई मेट्रो प्रादेशिक महामंडळ’ कायमस्वरूपी प्रदर्शनासाठी जागाही उपलब्ध करून देणार आहे.
मुंबई विद्यापीठाचा बहिशाल विभाग व पुरातत्त्व केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-साष्टीच्या पुरातत्त्वीय अवशेषांच्या शोधन कार्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या शोधन कार्याच्या पहिल्या टप्प्यात आढळलेली माहिती व अवशेषांचे नुकतेच सादरीकरण मुंबई विद्यापीठात झाले होते. यात ‘बिंबस्थाना’वरून मुंबई हे शहराचे नामकरण झाल्याची माहिती पुढे आली होती. तसेच, मुंबईत ठिकठिकाणी गधेगळ, प्राचीन मूर्ती, शिलालेख, गुहा आढळल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या कार्यशाळेत सहभागी असलेल्या पुरातत्त्वज्ञांनी आरे कॉलनीत मुंबई शहराच्या प्राचीन संस्कृतीवर प्रकाश पाडणाऱ्या अनेक बाबी आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडचे काम सुरू झाल्यास तेथील पुरातत्त्वीय खुणा लुप्त पावण्याची भीती या पुरातत्त्वज्ञांनी व्यक्त केली होती. याबाबतचे वृत्त १७ जुलैला ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल ‘एमएमआरसीएल’ने घेतली असून त्यांनी आरे कॉलनीतील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडच्या जागेसह कुलाबा ते सीप्झ या मेट्रोच्या मार्गाचे पुरातत्त्वीयदृष्टय़ा संशोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागाला आमंत्रित केले आहे. तसेच, या मार्गाच्या खोदकामादरम्यान काही अवशेष आढळल्यास त्याची तात्काळ पाहणी करण्यासाठी या विभागातील पुरातत्त्वज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे. तसेच अवशेषांचे कायमस्वरूपी प्रदर्शन उभारण्यासाठी ‘एमएमआरसीएल’ जागाही उपलब्ध करून देणार आहे.
‘आरे कॉलनीत पुरातत्त्वीय अवशेष आढळत असल्याचा दावा बहिशाल विभागाने मध्यंतरी केल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला होता. ही जागा पुरातत्त्वीयदृष्टय़ा संवेदनशील घोषित झालेली नसली तरी या ठिकाणी काही प्राचीन वस्तू सापडल्या तर त्यांचे जतन व्हावे ही आमचीदेखील इच्छा आहे,’ असे ‘एमएमआरसीएल’चे कार्यकारी संचालक रमण्णा यांनी स्पष्ट केले.
आरे कॉलनीत दडले काय?
आरे कॉलनीतील उल्टनपाडा, बांगोडा, मरोशी पाडा, मटई पाडा, खांबाचा पाडा, चारण देव पाडा, केल्टी पाडा आदी नऊ पाडय़ांच्या आसपास अनेक पुरातन देवी-देवतांची मंदिरे असून यांत वीर, क्षेत्रपाल, म्हसोबा, गावदेवी या देवांच्या जुन्या मूर्ती तसेच मंदिरांमध्ये वापरण्यात येणारे ‘किचका’चे दगड, खांबांचे भग्न अवशेष आढळले आहेत. या अवशेषांवरून येथील आदिवासी व अन्य जमातींच्या संस्कृतीचा इतिहास उलगडला जात असला तरी येथे पूर्वी नांदत असलेल्या नागरी संस्कृतीच्या पाऊलखुणा उलगडण्यासाठी संपूर्ण आरे कॉलनी परिसरात संशोधन आवश्यक असल्याचे पुरातत्त्वज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्याशी याबाबत संपर्क साधला असून मेट्रो-३ प्रकल्पाच्या जागांचे संशोधनासाठी पाहणी करण्यासाठी त्यांनी निमंत्रित केले आहे. तसेच, प्रकल्पाच्या कामादरम्यान काही अवशेष आढळल्यास त्याचे कायमस्वरूपी प्रदर्शन उभारण्याची त्यांनी तयारी दर्शविली. पावसाळा संपल्यावर आम्ही त्या जागांची पाहणी करणार आहोत.
-मुग्धा कर्णिक, बहिशाल विभागाच्या संचालिका, मुंबई विद्यापीठ