|| विनायक परब
मुंबईनजीक असलेल्या घारापुरी येथील शैव लेणींनी जागतिक वारसा वैभवाचा दर्जा मिळाल्याने हे ठिकाण आधुनिक काळात जागतिक पटलावर आले खरे; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे १६ व्या शतकात पोर्तुगीजांच्या आगमनापूर्वी अनेक शतकांआधीपासून ते जगाला परिचित होतेच. घारापुरी बेटावर इसवीसनपूर्व कालखंडामध्ये उभारलेल्या व्यापारी बंदराच्या धक्क्याचे अवशेष पुरातत्त्वतज्ज्ञांना सापडले. घारापुरीची लेणी जेवढी महत्त्वाची आहेत त्याहीपेक्षा येथील इतिहास काकणभर अधिक रोचक आहे. कोकणाचा उल्लेख आजपर्यंत ज्या ज्या वेळेस इतिहासामध्ये आला, त्या त्या वेळेस पुरी हे राजधानीचे ठिकाण होते, याचा उल्लेख येतो. मात्र ती पुरी म्हणजे मुंबईजवळची घारापुरी की कोकणातील राजापुरी खाडी परिसर याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. पोर्तुगीज या बेटावर उतरले त्या वेळेस तिथे असलेल्या हत्तींच्या दोन मोठय़ा शिल्पकृतींवरून या बेटाला त्यांनी एलिफंटा असे नाव दिले. त्यातील हत्तीची एक शिल्पकृती सागरतळाशी विसावली आहे, तर दुसरी सध्या भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पाहाता येते.
पुरी ही मौर्याची राजधानी होती आणि चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याने पुरीवर शेकडो जहाजांच्या साहाय्याने हल्ला चढवून ती काबीज केली असा संदर्भ ऐहोळे शिलालेखात सापडतो. चालुक्यांनंतर आठव्या शतकात पुरीचा ताबा राष्ट्रकुटांकडे गेला असावा. त्यानंतर १० व्या शतकात कल्याणी चालुक्य, यादव मुस्लीम, पोर्तुगीज, मराठा आणि अखेरीस ब्रिटिश साम्राज्य असा प्रवास असावा, असे इतिहासकारांना वाटते.
राजबंदर, शेतबंदर आणि मोराबंदर अशा तीन महत्त्वाच्या वस्ती घारापुरी बेटावर तीन दिशांना आजही पाहायला मिळतात. यातील दोन प्राचीन आहेत. आजवर या बेटावर चार महत्त्वाची उत्खनने झाली आहेत. त्यात व्यापारी बंदर म्हणून घारापुरीचे प्राचीनत्व इसवीसनपूर्व शतकापर्यंत मागे जाते, असे स्पष्ट करणारे पुरावशेष सापडले. यातील दक्षिणेच्या बाजूस असलेले राजबंदर हे महत्त्वाचे प्राचीन बंदर होते, असे उत्खननादरम्यान लक्षात आले. तिथे काही बौद्ध पुरावशेषही सापडल्याची नोंद आहे. तसेच क्षत्रपांचे चांदीचे नाणे, तसेच पहिल्या ते चौथ्या शतकापर्यंतची रोमन नाणी, इसवीसनपूर्व पहिल्या ते सन पहिल्या शतकापर्यंतची तांब्याचे काश्यार्पणही इथेच सापडले. १९७३ च्या सुमारास एका बंधाऱ्यासाठी खाणकाम सुरू असताना इथे जमिनीत गाडले गेलेले प्राचीन बंदराचे पुरावशेष सापडले. पुरावशेष असलेला तो बोटींसाठी वापरला जाणारा धक्का होता. सुमारे ७०० वर्षांच्या कालखंडामध्ये त्याची उंची तब्बल तीनदा वाढविण्यात आली होती, असेही पुरावशेषांच्या अभ्यासावरून लक्षात आले. हा धक्का पहिल्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत वापरात असावा. याच कालखंडातील लाल तकाकी असलेल्या भांडय़ांचे पुरावशेषही मोठय़ा प्रमाणावर आढळले. भांडी आणि इतर पुरावशेष यांचा कालखंड नेमका जुळणारा आहे. या ७०० वर्षांमधील हे समृद्ध बंदर असावे, असे त्यावरून सहज लक्षात येते. राजबंदर येथे समुद्राचे पाणी आतमध्ये येण्यासाठी जागा होती व बंदर काहीसे आतल्या बाजूस होते. मात्र अलीकडे इथे एका कृत्रिम तलावाचे बांधकाम करताना अनेक गोष्टी त्याखाली गाडल्या गेल्या. मात्र भारतीय पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननामध्ये येथेही पहिल्या शतकातील जेट्टीचे अवशेष सापडले होते. इथे सापडलेल्या पुरावशेषांवरून राजबंदर हा जेट्टीचा भाग आणि मोराबंदर हा निवासी वस्तीचा भाग असावा, असे संशोधकांच्या लक्षात आले.
त्यानंतर १९९२ साली एस. र. राव, ए. एस. गौर आणि शिला त्रिपाठी यांनी घारापुरीचे नव्याने गवेषण केले. त्याही वेळेस मोराबंदर परिसरातून काही तांब्याची तर काही शिशाची नाणी सापडली. यातील तांब्याच्या नाण्यांवरील ‘या’ हे ब्राह्मीतील अक्षर वाचता येण्याजोगे होते. इथे सापडलेली नाणी व भांडी ही मात्र भिन्न कालखंडांतील होती. भरती-ओहोटीच्या क्षेत्रामध्ये तर विविध प्रकारची लाल तकाकी असलेली भांडी अधिक संख्येने सापडली. या परिसरात मोठी निवासी वस्ती असावी, असे त्यावरून लक्षात येते. मोराबंदर परिसरातील टेकडीवरच घारापुरी येथे मोठय़ा बौद्ध स्तूपाचे अवशेष आजही पाहाता येतात.
सध्या घारापुरी येथे वापरात असलेली जेट्टी ही शेतबंदर परिसरामध्ये आहे. इथेही जुन्या जेट्टीचे अवशेष आणि त्याच्या खालच्या बाजूस विविध मृदभांडय़ांचे अवशेष सापडले होते. मोराबंदर हे सातवाहनकालीन सर्वात प्राचीन बंदर असावे, तर रोमन कालखंडात म्हणजेच पहिल्या व दुसऱ्या शतकात राजबंदर, तर अगदी अलीकडे म्हणजे पोर्तुगीजांच्या कालखंडात शेतबंदर अधिक वापरण्यात आले, असा निष्कर्ष १९९२ सालच्या उत्खननानंतर पुराविदांनी मांडला. असे लिहिलेले नाणे यज्ञश्री सातकर्णी या राजाचे असावे असा कयास आहे. कलचुरी कालखंडातील कृष्णराजाचीही बरीच नाणी सापडली असून ती सहाव्या-सातव्या शतकातील आहेत. एकुणात काय, तर पुलकेशी दुसरा ज्या पुरी या कोकणातील राजधानीचा उल्लेख करतो ती घारापुरीच आहे का, हे पक्के सांगता येणे कठीण आहे; पण असे असले तरी इसवीसनपूर्व कालखंडापासून घारापुरी हे समृद्ध व्यापारी बंदर म्हणून जगाला परिचित होते, यावर इथे सापडलेले पुरावशेष शिक्कामोर्तबच करतात.
vinayak.parab@expressindia.com
@vinayakparab