पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कार अपघाताची देशभरात चर्चा असतानाच आता मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली आणि त्या दोघांना फरफटत नेलं. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी पहाटे ५.३० वाजता हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर अपघात प्रकरणात बीएमडब्लू वाहनाचे मालक राजेश शाह शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती टाइम्स नाऊ या संकेतस्थळाने दिली. राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह हा अपघातावेळी वाहन चालवत असल्याचा दावा पीडित कुटुंब आणि प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. मात्र या दाव्याची चौकशी पोलीस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं

वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ अपघात घडला आहे. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात सदर दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉकला मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या बीएमडब्लू वाहनानं धडक दिली. दुचाकीवर मासळी असल्यामुळे दुचाकी चालवत असलेल्या पतीचं दुचाकीवर नियंत्रण सुटलं. त्यामुळे दोघेही वाहनाच्या बोनेटवर धडकले. पतीने बोनेटवरून बाजूला उडी घेतली. मात्र महिलेले वेळीच बाजूला होता आले नाही. त्यातच बीएमडब्लूच्या चालकाने वाहन पळविल्यामुळे महिलाही वाहनाबरोबर १०० मीटरपर्यंत फरफटत गेली.

“BMW चालकानं गाडी पळवली नसती तर…”, वरळीतील अपघातावर मनसेच्या संदीप देशपांडेंची संतप्त प्रतिक्रिया

चालक पोलिसांच्या ताब्यात

अपघातानंतर दाम्पत्याला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुर्दैवाने महिलेचा यात मृत्यू झाला. तर तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बीएमडब्लू वाहन ताब्यात घेतलं असून अपघातानंतर चालकाने पळ काढला होता. त्यालाही आता ताब्यात घेण्यात आले आहे. वरळी पोलीस ठाण्यात सदर अपघाताची सखोल चौकशी केली जात असून वरिष्ठ पोलीस अधिकारीही वरळीत पोहोचले आहेत.

ताजी अपडेट

वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी वरळी पोलीस ठाण्यातील पोलिसांची भेट घेतली आणि या प्रकरणात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई केली, याची माहिती घेतली. तसेच त्यांनी पीडित नाखवा कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run accident in the worli women dies after bmw knocks down fisherman couple shinde group leader arrest kvg
Show comments