Mumbai Worli Hit and Run Case : मुंबईतल्या वरळी या ठिकाणी झालेली हिट अँड रनची घटना ताजी आहे. मिहीर शाह याच्या बीएमडब्ल्यू कारने कावेरी नाखवा यांना धडक दिली. त्यानंतर त्यांना जवळपास चार किमी फरपटत नेलं. या प्रकरणात मिहीरला अटक झाली आहे. आता त्याच्याबाबतीत नवी माहिती समोर आली आहे. मिहीर हा शिवसेना नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. तो अपघातानंतर साठ तास फरार होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९ जुलैच्या दिवशी काय घडलं?

वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाहला पोलिसांनी विरार येथून ९ जुलै रोजी सायंकाळी अटक केली. अपघात झाल्यानंतर त्याने पलायन केले होते. गेले तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, त्याचा फोन बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परंतु, गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर त्याची आई आणि दोन मोठ्या बहिणांनीही मुरबाड येथून ताब्यात घेण्यात आलं.

हे पण वाचा- अपघातापूर्वी मिहीरने मालाड येथून बिअर खरेदी केली, गिरगाव ते सागरी सेतूपर्यंत मिहीरने मोटरगाडी चालवली

नेमकं प्रकरण काय?

७ जुलैच्या रविवारी पहाटे बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली होती. या धडकेनंतर चालकाने महिलेला काही किमीपर्यंत फरपटत नेलं होतं. वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ हा अपघात घडला होता. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात हे दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉकला मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना ही घटना घडली होती. प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा या दोघांनाही कारने धडक दिली. प्रदीप नाखवा हे एका बाजूला पडले तर कावेरी नाखवांना मिहीर शाहने फरपटत नेलं. यात त्यांचा मृत्यू झाला. याच मिहीर शाहबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

मुंबईतील हिट अॅन्ड रन प्रकरणातील मिहीर शाहला कसं अटक केलं? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मिहीर शाह याचा मद्यप्राशन करण्याची सवय

मिहीर शाह याला मद्यप्राशन करायची सवय आहे. त्याने स्वतःच पोलीस चौकशीत ही बाब मान्य केली आहे. पोलीस सूत्रांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली. अटक केल्यानंतर त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या दरम्यान त्याची जी चौकशी सुरु आहे त्या चौकशीत त्याने दारु पिण्याची सवय असल्याचं मान्य केलं आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शाहने वरळीतून पळ काढला होता. त्यानंतर तो विरारला गेला. तिथे त्याने ओळख लपवण्यासाठी एका सलूनमध्ये जात दाढी आणि केस कापले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं ही बाबही मिहीर शाह याने मान्य केली. मिहीर शाह हा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. अपघात झाल्यानंतर ६० तासांनी त्याला अटक करण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run case mihir shah confessd that he is habitual drinker in police custody scj
Show comments