पोलिसांकडून समन्स न मिळाल्यामुळे अभिनेता सलमान खान झोपलेल्या लोकांना चिरडण्याच्या खटल्याप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयात सोमवारी गैरहजर राहिला. हा खटला वांद्रयातील महानगर दंडाधिकाऱयांकडून मुंबई सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आल्यानंतर सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे.  या प्रकरणी पुढील सुनावणी ८ एप्रिलला होणार आहे.
स्वतःवरील उपचारांसाठी अमेरिकेला गेलेला सलमान शनिवारी रात्री मुंबईत परतला. खटल्याच्या सुनावणीसाठी सोमवारी तो न्यायालयात हजर राहील, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, समन्सच न मिळाल्यामुळे त्याने सुनावणीसाठी गैरहजर राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
सलमानविरुद्ध महानगर दंडाधिकाऱ्यांनी नव्याने सदोष मनुष्यवधाचा आरोप लावून त्याच्याविरुद्धचा खटला पुन्हा सुनावणीसाठी सत्र न्यायालयाकडे वर्ग केला त्यावर सलमानची बाजू सत्र न्यायालयात त्याचे वकील मांडणार आहेत. सत्र न्यायालयाचे न्या. यू. बी. हेजिब यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी होणार आहे.