मुंबई : ‘न्यू इंडिया को ऑप बँक’ अपहाराप्रकरणी अटक करण्यात आलेला बँकेेचा महाव्यवस्थापक व लेखा विभागाचा प्रमुख हितेश मेहता व बांधकाम व्यावासायिक धर्मेश पौन यांना गुरूवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. गरज पडल्यास आर्थिक गुन्हे शाखा दोन्ही आरोपींचा पुन्हा ताबा घेणार आहेत. याप्रकरणी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यात १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.
मेहताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला पोलिसांनी अटक केली. अपहाराच्या रक्कमेतील ७० कोटी रुपये मेहताने पौनला दिल्याचा संशय आहे. गैरव्यवहार सुरू असतानाही त्याच्याकडे कानाडोळा करणारे बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदर भोअन यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्याला याप्रकरणात एक ते दोन कोटी रुपये मिळाल्याचा संशय आहे. याशिवाय याप्रकरणात अरूण भाई नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू असून त्याला ४० कोटी रुपये मिळाल्याचे मेहताने सांगितले आहे.
या गैरव्यवहारातील १२२ कोटी रुपयांपैकी ७० कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक पौनला मिळाले होते. त्याने ते चारकोप येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत गुंतवल्याचे मेहताने चौकशीत सांगितले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा बँकेचे लेखापरिक्षण करणाऱ्या सहा लेखा परिक्षण करणाऱ्या कंपन्यांशी संबंधीत व्यक्तींची चौकशी करत आहे. त्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.