मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेली वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये मागील अडीच वर्षांपासून आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) बंद असल्याने रुग्णांना हाताने औषधचिठ्ठी लिहून दिली जात आहे. त्यामुळे रुग्णांची वैद्यकीय माहिती संकलित होत नसल्याने रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना पुन्हा पुन्हा रुग्णांकडे विचारणा करावी लागत आहे.

तसेच माहिती उपलब्ध नसल्याने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ही प्रणाली सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्याची प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये एचएमआयएस प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली कार्यरत असणे बंधनकारक आहे. मात्र ५ जुलै २०२२ पासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये ही सेवा बंद करण्यात आली आहे. परिणामी मागील अडीच वर्षांपासून रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती व औषधचिठ्ठी डॉक्टर हाताने लिहून देत आहेत. त्यामुळे आयोगाच्या नियमांची पायमल्ली हाेत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रामध्ये बोलले जात होते.

एचएमआयएस प्रणालीमुळे रुग्णांची वैद्यकीय माहिती संकलित होऊन रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टरांना मदत होते. तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना त्यांच्या संशोधनासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरत असते. ही बाब लक्षात घेत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये एचएमआयएस प्रणाली सुरू करण्याबाबतची मागणी वारंवार डॉक्टरांकडून करण्यात येत होती. ही प्रणाली सुरू करण्याबाबत मागील अनेक महिन्यांपासून वैद्यकीय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.

यंत्रसामग्री खरेदीला मंजूरी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारित असलेल्या ५२ शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय आणि होमिओपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी एचएमआयएस प्रणाली लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या प्रणालीसाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ३६६ बार कोड स्कॅनर खरेदीसाठी २९ लाख रुपये, तर ऑल इन वन संगणक आणि ६५० प्रिंटर खरेदीसाठी सात कोटी २८ लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. एचएमआयएस प्रणालीसाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी झाल्यानंतर ही प्रणाली लागू करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.