पावसाची प्रतीक्षा करत आकाशाकडे डोळे लावलेल्या मुंबईकरांच्या पायाखाली मात्र खड्डय़ांची संख्या वाढते आहे. जोरदार पावसाच्या पहिल्याच टप्प्यात रस्त्यावर सुरू झालेली खड्डय़ांची रांगोळी दिवसेंदिवस मोठी होत आहे. गेल्या १० दिवसांत अवघा १३ मिलिमीटर पाऊस पडलेला असताना रस्त्यांवरील खड्डे मात्र ४०० हून अधिक वाढले आहेत. सर्वाधिक खड्डे बोरिवली ते गोरेगाव, अंधेरी तसेच कुर्ला येथे नोंदवण्यात आले आहेत.
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे नोंदवण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या अधिकृत संकेतस्थळावरील नोंदीनुसार शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत संपूर्ण शहरात १६९६ खड्डय़ांची नोंद झाली होती. ३० जून रोजी खड्डय़ांची संख्या १२७४ होती. याचाच अर्थ गेल्या १० दिवसांत खड्डय़ांच्या संख्येत तब्बल ४२२ने वाढ झाली आहे. यातील १४२० खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. तब्बल तीन आठवडे पावसाने उसंत घेऊनही पालिकेला रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्यात अपयश येत आहे.
गेल्या वर्षी पालिकेने रस्त्यांवरील खड्डय़ांसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र या वेळी रस्त्यांचे काम चांगले झाले असल्याने खड्डे कमी पडतील या अंदाजामुळे या खर्चात ११ कोटी रुपयांची घट करण्यात आली. त्यातच तीन आठवडे पाऊस पडला नसल्याने एकीकडे खड्डे बुजवण्यासाठी अवकाश मिळालेला असून रस्त्यांवर अधिक वेगाने खड्डे निर्माण होण्याची मानहानी टळली आहे. मात्र तरीही रस्त्यांवरील खड्डय़ांची संख्या जूनच्या तुलनेत ४०० ने वाढली. सर्वात जास्त खड्डे पश्चिम उपनगरात बोरिवली ते गोरेगाव पट्टय़ात नोंदवले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा