पर्यावरणस्नेही रंग असल्याचे खोटे दावे; रासायनिक रंगांची व्याख्या निश्चित नसल्याने उत्पादक मोकाट
धुळवडीला रासायनिक रंगांचा वापर केल्यामुळे त्वचेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन अलीकडे नागरिक पर्यावरणपूरक किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करण्यावर भर देतात. परंतु, अनेक उत्पादक ‘नैसर्गिक रंग’ किंवा ‘इको-फ्रेंडली’ अशा नावांनी रासायनिक रंगांची विक्री करत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे, रासायनिक रंगांमधील घटकांच्या प्रमाणाबाबत कोणतीही व्याख्या निश्चित न करण्यात आल्याने उत्पादक कोणत्याही रसायनांपासून तयार झालेले रंग बाजारात आणत आहेत.
होळी येण्याच्या आठ दिवस आधीच पर्यावरणपूरक अशा नैसर्गिक रंगांनी होळी साजरी करण्याचे संदेश समाजमाध्यमांमधून पसरायला सुरुवात होते. परंतु नैसर्गिक रंगांची बाजारातील उपलब्धता मागणीच्या तुलनेत फारच नगण्य आहे. तसेच बाजारातील रंगाच्या तुलनेत हे रंग महागही आहेत.
नैसर्गिक रंग हे भाज्यांची पाने, विविध फुलांच्या पाकळ्या सावलीत सुकवून नंतर त्याची भुकटी केली जाते. त्यामध्ये तांदळाचे किंवा चण्याच्या डाळीचे पीठ मिसळून मग हे रंग तयार केले जातात. यासाठी उपलब्ध असा मर्यादित कच्चा माल आणि वेळ यामुळे त्याची किंमत तर वाढतेच शिवाय बाजाराच्या मागणीच्या प्रमाणात उत्पादन करणेही शक्य नाही, अशी माहिती पर्यावरण दक्षता मंचच्या सचिव संगीता जोशी यांनी दिली. ‘दरवर्षी आमची संस्था नैसर्गिक रंगांची निर्मिती करून विक्रीस ठेवते. नैसर्गिक रंगांची किंमत साधारणपणे ७०० रुपये किलो अशी आहे. ५० ग्रॅमची छोटी पॅकेटे साधारणपणे ४० रुपयांना उपलब्ध आहेत. बाजारातील रंगांच्या तुलनेत हे रंग महाग असले तरी बरेच जण हे खरेदी करतात,’ अशी माहिती त्यांनी दिली.
बाजारामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या रायायनिक रंगाबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात नाहीत. त्यामुळे बाजारातील शरीराला घातक असणाऱ्या या रंगांवर अन्न व औषध प्रशासनाला नियंत्रण आणणे शक्य नाही. आतापर्यंत होळीच्या काळात येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने रासायनिक रंग विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात केली गेली. परंतु रासायनिक रंग म्हणजे नेमकं काय किंवा शरीराला घातक न ठरणारे रंग म्हणजे कोणते याबाबत स्पष्टता नसल्याने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्याची मागणी राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने केंद्राकडे केली आहे, असे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले.
‘शरीराची काळजी घ्या’
- त्वचा आणि केस यांवर होळीच्या रंगांमुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी नैसर्गिक रंगांनीच होळी खेळणे योग्य आहे, असे त्वचारोग आणि सौंदर्यप्रसाधन तज्ज्ञ डॉ. वृषाली सुरवदे यांनी सांगितले.
- होळी खेळण्याच्या किमान तासभर आधी त्वचेवर मॉइश्चरायझरचा जाडसर थर लावावा. तसेच केस खराब होऊ नयेत यासाठी केसांना तेल लावून बांधून ठेवावेत.
- होळीचे रंग नखांमध्ये शिरल्यास ते बराच काळ निघत नाहीत. त्यामुळे नखे कापून त्यावर नेलपेंटचा जाडसर थर लावावा.
- होळी खेळल्यानंतर चेहरा धुताना क्लिन्झरचा वापर करावा. तसेच केस धुताना कंडिशनरचा वापर करावा.
- होळी खेळताना डोळ्यांमध्ये रंग जाऊ नये, याची काळजी घ्यावी. तसेच शक्य झाल्यास चष्मा वापरावा. त्यातूनही रंग गेल्यास डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत, असे शताब्दी रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. हर्षां पवार यांनी सांगितले.